अमरावती Mango Trees Planted By British : इंग्रजांनी आजपासून 77 वर्षांपूर्वी भारत सोडला. भारत सोडून जाताना इंग्रज अनेक इमारती, उद्योग, रेल्वे, बोगदे असं बरंच काही भारतात आपली आठवण म्हणून ठेवून गेलेत. सातपुडा पर्वत रांगेत समुद्र सपाटीपासून 974 मीटर उंचावर वसलेल्या माखला या गावात देखील विविध प्रजातीच्या 200 च्या वर आंब्यांची वृक्ष असणारी आमराई देखील इंग्रजांचीच देण आहे. विशेष म्हणजे 1700 लोकसंख्या असणाऱ्या या गावात आजच्याघडीला तब्बल दोन हजारांच्या वर आंब्याची झाडं बहरली आहेत.
असे पोहोचले माखला गावात इंग्रज : माखला या गावात खुमानसिंह या राज्याचं राज्य होतं. 1857 च्या राष्ट्रीय उठावादरम्यान तात्या टोपे यांनी माखला गावातील खुमानसिंह राज्याच्या राजवाड्यात आश्रय घेतला होता. तात्या टोपेंचा पाठलाग करीत इंग्रज घनदाट जंगल परिसरात असलेल्या माखला गावात पोहोचले. इंग्रजी फौज येत असल्याची चाहूल लागताच तात्या टोपेनं तिथून पळ काढला. तात्या टोपेंनी तेथून पळ काढल्यानंतर इंग्रजांनी या परिसरातील एकूण दीडशे कोरकू आदिवासी बांधवांना फाशी दिली आणि त्यांची मृतदेह पहाडाखाली खोल दरीत फेकून दिली. तेव्हापासून माखला गावापासून काही अंतरावर असणारी दरी ही भूतखोरा या नावानं ओळखली जाते.
माखल्याच्या सौंदर्यानं इंग्रजांना घातली भुरळ : मेळघाटातील अतिशय उंच भागांपैकी एक असणारा माखला हा परिसर पाहून इंग्रज अधिकारी भारावून गेले होते. या परिसराचा विकास व्हावा अशी कल्पना इंग्रजांना सुचली. त्यावेळी विविध फळझाडांनी बहरलेल्या या भागात इंग्रजांनी आंब्याची 200 झाड आणून लावली. काही वर्षातच इंग्रजांची आमराई बहरली. विशेष म्हणजे या आमराईचा विस्तार नैसर्गिकरित्या पुढं होत गेला. आज माखला गावात दोन हजारांच्यावर आंब्याची झाडं आहेत. गावातील प्रत्येक आदिवासी शेतकऱ्याच्या शेतात आंब्याचं झाड डौलात उभं असल्याची माहिती मेळघाटच्या जंगलाचे जाणकार प्रदीप हिरुळकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. माखला येथील जंगलात कोळशी, कुंकू, आरंग, जांभूळ, वड, हिरडा, मोह, उंबर आदी प्रकारचे वृक्ष आहेत. यासह निळसर पांढऱ्या रंगाची नाजूक फुलं तसंच रानचमेली, कारवी, माहोळ आदी वेलीही या भागात आढळतात. त्यावेळी सातपुडा पर्वताच्या उंच टोकावर असणारा माखला आणि आजच्या चिखलदारा या दोनपैकी एका ठिकाणाचा विकास करण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला होता. माखला या गावाची निवड आधी केली असली तरी पुढं मात्र इंग्रजांनी आजच्या चिखलदरा परिसराला विकासाच्या दृष्टीनं प्राधान्य दिलं, असं देखील प्रदीप हिरुळकर यांनी सांगितलं.
असे आहेत माखल्याचे आंबे : इंग्रजांनी निर्माण केलेल्या माखल्याच्या आमराईमध्ये विविध प्रजातीचे आंबे आहेत. या आंब्याचा रस करताना त्यात साखरेची देखील गरज भासत नाही. आदिवासी भाषेत गोब्या आम, कटर आम, शिकल आम, ढपका आम, डोकोडोको आम, गुरगुटी आम अशा आगळ्यावेगळ्या नावानं या भागातील आंब्याच्या प्रजाती ओळखल्या जात असल्याची माहिती माखला गावातील स्थानिक रहिवासी असणाऱ्या लाडकीबाई जामुनकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
पर्यटकांना मोहात पाडणारी आमराई : मेळघाटातील माखला हे गाव अतिदुर्गम गाव म्हणून ओळखल्या जातं. परतवाडा ते धारणी या मार्गावर सेमाडोह गावापासून उंच पाडावर सुमारे 12 किलोमीटर अंतरावर माखला हे गाव वसलंय. उंच डोंगरावरील या गावाला जाणारा घाटवळणाचा रस्ता अतिशय खराब आहे. या अशा परिस्थितीमुळं मेळघाटात येणारे पर्यटक माखला गावात सहसा पोहोचतच नाहीत. असं असलं तरी ज्यांना या परिसराची माहिती आहे असे पर्यटक माखला येथे येतात. तर पर्यटनाच्या दृष्टीनं आमच्या माखला गावाचा विकास झाला तर या परिसरातही आमराई पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येतील, असा विश्वास माखला गावातील रहिवासी धनंजय सायरे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
नवरा नवरी झाडापासून आमराईला सुरुवात : माखला गावापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर इंग्रजांची ही आमराई आहे. या आमराईत प्रवेश घेतानाच आंब्याची तीन विशिष्ट झाडं एकाच ठिकाणी जणू या भागात येणाऱ्यांचं स्वागत करीत आहेत असे भासतात. या तीन पैकी दोन झाडं ही एकमेकात गुंतली असून त्यांना माखला येथील आदिवासी बांधव नवरा-नवरी म्हणतात. तर त्यांच्या शेजारीच असणाऱ्या आणि नव्यानं बहरलेल्या झाडाला या नवरा नवरीचा मुलगा असं म्हटलं जातं.
हेही वाचा -
- मेळघाटात 'वॉटर ॲप्पल', अंदमान निकोबार बेटावरचे फळ बहरले विदर्भात - water apple in melghat
- अमरावतीत 400 वर्ष जुने औषधी गुणयुक्त गोरखचिंचेचं झाड, मूळच्या आफ्रिकेतील या वृक्षाला असतं दीड ते दोन हजार वर्ष आयुष्य - Gorakhchinch tree
- चिमुकल्यांनी अनुभवला 'शून्य सावली दिवस', वाचा काय असतो शून्य सावली दिवस? - Zero Shadow Day