पंढरपूर vitthal rukmini mandir : संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सध्या पुरातत्व विभागाच्या वतीनं सुशोभीकरणाचं काम सुरु आहे. सातशे वर्षापूर्वीचं मूळ विठ्ठल मंदिर साकारण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. अशातच मंदिर परिसरात कानोपात्रा मंदिराजवळ तळघर आढळून आलय. सहा बाय सहा फुटाचं हे तळघर असून यात तीन फूट उंचीच्या दोन व्यंकटेशाच्या मूर्ती, जुनी नाणी, एक देवीची मूर्ती आणि पादुका सापडल्या आहेत. या मूर्ती पंधरा ते सोळाव्या शतकातील असण्याचा अंदाज पुरातत्व विभागाचे संचालक विलास शहाणे यांनी वर्तवला आहे. याचा अहवाल शासनाकडं पाठवण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
15 ते 16 व्या शतकातील मूर्ती: तळघर हे सहा फूट उंचीचं असून, तळघरांमध्ये उतरण्यासाठी तीन टप्पे आहेत. दगडी चिरेबंदीमध्ये हे तळघर बांधण्यात आलं असून, शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी या मूर्ती तळघरांमध्ये ठेवण्यात आल्याचा अंदाज पुरातत्व विभागाच्या वतीनं वर्तवण्यात येत आहे. या तळघरांमध्ये सापडलेल्या दोन मूर्ती विष्णूच्या अवतारातील असून एक मूर्ती 15 व्या शतकातील आणि दुसरी मूर्ती ही 16 व्या शतकातील असल्याचा अंदाज पुरातत्व विभागाच्या वतीनं वर्तवण्यात येत आहे. 15 शतकातील मूर्तीपेक्षा 16 व्या शतकातील मूर्ती ही अधिक सुबक आणि अचूक असल्याचं दिसून येत आहे.
15 मार्चपासून मंदिराचं काम सुरू : विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं आणि जिर्णोद्वारचं काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून करण्यात येत आहे. 15 मार्चपासून मंदिर संवर्धन आणि जिर्णोद्वार आराखड्यातील प्रस्ताविक कामांपैकी बाजीराव पडसाळी, सोळखांबी, गर्भगृह, सभामंडळ आणि इतर ठिकाणी काम सुरु आहे. काम अंतिम टप्प्यात आलं असून 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. मंदिराचं 700 वर्षापूर्वीचं मूळ रुप समोर आल्यानंतर मंदिरातील नऊ दरवाजे चांदीनं चकाकणार आहेत. यासाठी 800 ते 900 किलो चांदीचा वापर केला जाणार आहे. याचबरोबर मंदिरातील गरुड खांब आणि मेघडंबरी देखील चांदीनं मढवली जाणार आहे.
हेही वाचा