पुणे MD Drugs Seized : 'ड्रग्ज मुक्त अभियान' पुणे पोलिसांनी हाती घेतलं आहे. पुणे पोलिसांनी ड्रग्ज विरोधात पुणे, सांगली आणि दिल्ली येथे मोठी कारवाई केलीय. जवळपास 3600 हून अधिक कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त केलाय. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत 8 जणांना अटक केलीय. दिल्ली येथून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडं तपास केला असता, डेल्टा कुरिअरच्या माध्यमातून लंडनला 140 किलो ड्रग्ज पुरवठा करण्यात आल्याचं पोलीस चौकशीत उघडकीस आलंय.
15 ते 20 बॅरलमध्ये एमडी ड्रग : कुरकुंभ एमआयडीसी याठिकाणी जून 2023 पासून आरोपींनी ड्रग्जचं उत्पादन सुरू केलं होतं. संबंधित कंपनीतून छोट्या टेम्पोमध्ये 25 किलोच्या वेगवेगळ्या 15 ते 20 बॅरलमध्ये एमडी ड्रग्ज भरून दिल्लीला नेण्यात येत होतं. दिल्ली या ठिकाणी संदीप यादव या आरोपीची डेल्टा कुरिअर कंपनी कार्यरत आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून संदीप यादव वेगवेगळ्या देशांमध्ये फूड पॅकेटची कुरियर सेवा देतो.
अन्नपदार्थ पॅकिंगमध्ये एमडी ड्रग्ज : डेल्टा कुरिअर कंपनीचा गैरवापर करून फरार आरोपी वीरेन सिंग याच्या मार्गदर्शनाखाली फूड पॅकेटमध्ये ॲल्युमिनियम फॉईलचा वापर करून त्यात एमडी ड्रग्ज ठेवलं आणि त्याच्या वरील आणि खालील बाजूस अन्नपदार्थ ठेवून आंतरराष्ट्रीय दर्जाचं पॅकिंग तयार केलं. विमानतळावर कार्गो तपासणीसाठी संबंधित माल गेल्यानंतर मोठ्या स्कॅनरमध्ये अन्नपदार्थांमध्ये एमडी ड्रग्ज हे दिसून येत नव्हतं. त्याचा गैरफायदा घेत आरोपींनी मोठ्या प्रमाणात लंडनला ड्रग्ज पाठवल्याचं निष्पन्न झालंय. या गुन्ह्यातील परदेशात फरार झालेला मुख्य आरोपी संदीप धुनिया याने तेथील एजंटांशी संपर्क करत पुरवठा केला होता.
कुरिअरच्या माध्यमातून लंडनला पाठवले ड्रग्ज : पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत पुणे, सांगली आणि दिल्ली येथे कारवाई करत जवळपास 3600 हून अधिक कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केलंय. पुणे पोलिसांकडून दिल्ली येथे जी कारवाई करण्यात आली त्यात 970 किलो एमडी जप्त करण्यात आलंय.
हेही वाचा -