मुंबई MLA Won In Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक निकाल 2024 नुकताच लागला असून यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीची चांगलीच सरशी झाली. दुसरीकडं लोकसभा निवडणुकीत तब्बल 13 आमदारांनी आपलं नशीब आजमावलं. यात तब्बल 7 आमदारांना खासदार पदाची लॉटरी लागली आहे. यात शिवसेनेच्या एका मंत्र्यांनीही नशीब आजमावलं, त्यांनाही छत्रपती संभाजीनगरमधून विजयाची लॉटरी लागली. लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये महाविकास आघाडीच्या पाच आणि महायुतीच्या दोन आमदारांनी यश मिळवलं आहे.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये 7 आमदार झाले खासदार : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये तब्बल सात आमदारांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली आहे. यात महाविकास आघाडीचे 5 तर महायुतीच्या दोन आमदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विजयी उमेदवारांपैकी एक शिवसेनेचा मंत्री होता. विजयी आमदारांमध्ये कल्याण काळे, प्रतिभा धानोरकर, बळवंत वानखेडे, वर्षा गायकवाड आणि प्रणिती शिंदे हे काँग्रेसचे पाच आमदार विजयी झाले आहेत. मंत्री संदिपान भुमरे आणि रवींद्र वायकर हे सत्ताधारी शिवसेनेचे लोकसभा लढवणारे दोन आमदारही जिंकले आहेत.
या आमदारांच्या माथी बसला लोकसभा हारल्याचा शिक्का : लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या सहा आमदारांच्या माथी लोकसभा निवडणूक 2024 हारल्याचा शिक्का बसला आहे. यात भाजपाचे आमदार राम सातपुते आणि सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि विकास ठाकरे, शिवसेनेच्या यामिनी जाधव आणि राष्ट्रवादीचे आमदार शाशिकांत शिंदे या आमदारांचा समावेश आहे.
आमदार कल्याण काळेंचा भाजपाला मोठा धक्का : काँग्रेसचे आमदार कल्याण काळे यांनी विद्यमान खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा 1 लाख 09 हजार 958 मतांनं पराभव केला. जालना लोकसभेच्या जागेवर रावसाहेब दानवे यांचा एकतर्फी वचक आहे. मागील तीन दशकांपासून जालना हा रावसाहेब दानवे यांचा गड असल्यानं त्यांचा पराभव हा भाजपाला मोठा धक्का आहे. दुसरीकडं आमदार प्रतिबा धानोरकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जोरदार पराभव केला. प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळू धानोरकर यांचं निधन झाल्याची सहानुभूती त्यांना मिळाली. मात्र सुधीर मुनगंटीवार यांना केंद्रात जाणं पसंत नसल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या आमदारांनी लढवली लोकसभा :
- बळवंत वानखेडे
- कल्याण काळे
- प्रतिभा धानोरकर
- वर्षा गायकवाड
- प्रणिती शिंदे
- संदिपान भुमरे
- रवींद्र वायकर
- राम सातपुते
- सुधीर मुनगंटीवार
- रवींद्र धंगेकर
- विकास ठाकरे
- यामिनी जाधव
- शाशिकांत शिंदे
हेही वाचा :