सातारा Satara Crime News : सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेनं २३ लाख रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी दीपक आबा झणझणे (रा. सासवड-झणझणे, ता. फलटण आणि मधुकर शिवाजी कदम (रा. देऊर, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली आहे.
२३ किलो अफूची झाडे केली जप्त : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, सासवड (झणझणे) आणि देऊर येथील शेतात अफूची लागवड केली आहे. त्यानुसार देवकर यांनी आपल्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकानं देऊर (ता. कोरेगाव) येथे छापा मारून ४ लाख ६७ हजार रुपये किंमतीची २३ किलो अफूची झाडे जप्त केली.
९० किलो अफूची झाडे जप्त : लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे आणि उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या पथकाने सासवड-झणझणे (ता. फलटण) येथे छापा टाकला. तसेच संशयिताच्या शेतातून १८ लाख १६ हजार रुपये किंमतीची ९० किलो अफूची झाडे जप्त केली. या दोन्ही घटनेतील संशयितांवर गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
अंमली पदार्थ जप्त : स्थानिक गुन्हे शाखेने नोव्हेंबर २०२२ पासून गांजा, गांजाची झाडे आणि अफूची या अंमली पदार्थ विरोधी एकूण ११ कारवाया करुन १ कोटी ८७ लाख ७७ हजार रुपये किमतीचा ७७५ किलो ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले.
हेही वाचा -