ॲडलेड AUS vs IND 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना आजपासून ॲडलेडच्या मैदानावर सुरु झाला आहे. गुलाबी चेंडूनं खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा मैदानात उतरला तेव्हा प्रत्येकाच्या हातावर काळी पट्टी बांधली होती, त्यामागं एक खास कारण समोर आलं. खरं तर, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आपला दिवंगत खेळाडू फिल ह्यूजेसच्या स्मृतीप्रित्यर्थ काळी पट्टी बांधली होती, ज्याचा शेफिल्ड शील्ड सामन्यात फलंदाजी करताना बाउन्सर चेंडू लागून मृत्यू झाला होता.
What could have been ... 😢
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2024
Incredible read from @AdamBurnett09 about the path Phillip Hughes took, and the one he was supposed to walk next: https://t.co/eKtcQVmfPJ pic.twitter.com/oF85IEP3Bi
ह्यूजच्या 10व्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम : फिल ह्युजेसचा 10 वर्षांपूर्वी मैदानावर फलंदाजी करताना बाउन्सर चेंडू लागून मृत्यू झाला तेव्हा संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला होता आणि भारतीय संघही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. ह्यूजच्या मृत्यूला आता 10 वर्षे पूर्ण होत असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याच्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याशिवाय ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ह्यूजच्या स्मरणार्थ आणि त्याच्या सन्मानार्थ भारताविरुद्धच्या ॲडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी हातावर काळ्या पट्टी बांधून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ह्यूजचा मृत्यू झाला तेव्हा त्यानं ऑस्ट्रेलियन संघासाठी 26 कसोटी सामने खेळले होते.
फिल ह्युजेसची आंतरराष्ट्रीय कारकीर्द : माजी डावखुरा सलामीवीर फिल ह्यूज ऑस्ट्रेलियाकडून 26 कसोटी सामने खेळला. यात त्यानं 1535 धावा केल्या ज्यात 3 शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. ह्युजच्या नावावर 25 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 826 धावा आहेत. ह्युजनं वनडेमध्ये 2 शतकं आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत. ह्युजची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या 161 धावा होती तर वनडेत नाबाद 138 धावांची त्याची सर्वोत्तम खेळी होती.
Australia playing with the black armbands to give Phil Hughes a tribute. ❤️ pic.twitter.com/Gblmfz1TQa
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 6, 2024
ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाची शानदार सुरुवात : ऑस्ट्रेलियन संघानं ॲडलेड कसोटी सामन्यात शानदार सुरुवात केली असून पहिल्या सत्राच्या अखेरीस त्यांनी भारताच्या 4 खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. भारतीय संघानं 82 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कनं पहिल्या सत्रात 3 विकेट घेतल्या, तर स्कॉट बोलंडनंही एक विकेट घेतली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मधल्या फळीत फलंदाजी करत आहे.
हेही वाचा :