पर्थ Australia Announced Squad : ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी आपला क्रिकेट संघ जाहीर केला आहे. T20 मालिकेसाठी 13 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, तर वनडे मालिकेसाठी 14 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. पॅट कमिन्स पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे. पण, T20 संघाचा कर्णधार कोण असेल, हा मोठा प्रश्न आहे. वास्तविक, ऑस्ट्रेलियानं T20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली. परंतु, त्यांच्या कर्णधाराचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 ते 18 नोव्हेंबर दरम्यान 3 सामन्यांची वनडे आणि T20 मालिका खेळवली जाणार आहे.
Introducing our Men’s T20I squad to take on @TheRealPCB next month 🇦🇺 🇵🇰 pic.twitter.com/5TdEF3EqMd
— Cricket Australia (@CricketAus) October 28, 2024
ऑस्ट्रेलियाला नवीन T20 कर्णधाराची गरज का? : मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाच्या T20 संघाचा कर्णधार असला तरी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत तो कर्णधार असणार नाही. मिचेल मार्श या मालिकेत कर्णधार न होण्याचं कारण खरं तर तो या मालिकेत न खेळणे हे आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्श भारताविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी पाकिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेतून बाहेर होणार आहे.
T20 च्या संघाला कर्णधार नाही : पाकिस्तानविरुद्धची T20 मालिका 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार असून ती 18 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. दरम्यान, बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाला तयारी पूर्ण करण्यासाठी पर्थ इथं यावं लागेल, जिथं 22 नोव्हेंबरपासून मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवला जाईल. आता मार्श भारताविरुद्धच्या ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा भाग असल्यानं, पाकिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेत तो कर्णधार नसेल.
T20 मालिकेत कर्णधारच नाही तर प्रशिक्षकही नवीन : जोस इंग्लिस, मॅथ्यू शॉर्ट आणि ॲडम झाम्पा हे पाकिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेत मिचेल मार्शच्या जागी कर्णधार म्हणून तीन मोठे दावेदार आहेत. मात्र, 13 सदस्यीय संघात कर्णधारपदाचा पूर्वीचा अनुभव असलेला एकही खेळाडू नाही. पाकिस्तानविरुद्धच्या T20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला केवळ नियमित कर्णधारच नाही तर मुख्य प्रशिक्षकाचीही उणीव भासणार आहे. वास्तविक, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अँड्र्यू मॅकडोनाल्ड प्रशिक्षक नसतील. त्यांच्या जागी आंद्रे बोरोवेक T20 मालिकेत संघाचे प्रशिक्षक असतील.
ऑस्ट्रेलियाचा T20 संघ : झेवियर बार्टलेट, शॉन ॲबॉट, कूपर कोनेली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस. जॅक फ्रेझर, आरोन हार्डी, जोस इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा
वनडे मालिकेत पॅट कमिन्स कर्णधार : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील 3 वनडे मालिका 4 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 10 नोव्हेंबरला संपेल. यासाठी पॅट कमिन्स 14 खेळाडूंची कमान सांभाळेल. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाचं संपूर्ण लक्ष भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेवर असेल.
ऑस्ट्रेलिया वनडे संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, कूपर कोनेली, जेक फ्रेझर, ॲरॉन हार्डी, जोस हेझलवूड, जोस इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झम्पा.
हेही वाचा :