हैदराबाद Viswanathan Anand : बुद्धिबळातील ग्रँडमास्टर म्हणून विश्वनाथन आनंद यांचं नाव घेतलं जातं. बुद्धिबळातील त्याच्या कुशल खेळीनं त्यांचं नाव यशस्वी बुद्धिबळपटूंच्या यादीत सामिल आहे. बुद्धिबळाच्या खेळात आनंद यांनं आपल्या शानदार कामगिरीनं सर्वांची मनं जिंकली आहेत. त्यांनं एकूण 5 वेळा विश्वविजेतेपद पटकावलं आहे. बुद्धिबळचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी 'आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिना'निमित्त तरुणांना प्रेरणादायी संदेश दिलाय.
विश्वनाथन आनंद म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. बुद्धिबळ हा केवळ एक खेळ नाही, तर तो काहीतरी नवीन शिकण्याचा आणि आत्मशोधाचा प्रवास आहे. तुम्ही हा दिवस साजरा करत असताना, मला माझ्या प्रवासातील काही क्षण तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत जे तुम्हाला प्रेरणा देतील."
यशस्वी झालो असं नाही पण... : विश्वनाथन आनंद यांच्या यशात त्यांच्या आईचा सर्वात मोठा वाटा असल्याचं ते सांगतात. ते म्हणाले की, "जेव्हा मी 7 वर्षांचा होतो, तेव्हा माझं कुटुंब मनिला येथं राहायला गेलं. तिथेच माझ्या मनात बुद्धिबळ खेळाची आवड निर्माण झाली. माझी बुद्धिबळातील आवड निर्माण करण्यात माझ्या आईनं महत्त्वाची भूमिका बजावली. आईनं माझ्यासाठी बुद्धिबळ खेळण्याच्या संधी शोधून काढल्या. सुरुवातीला कठीण आव्हानं असूनही त्यावर मात केली आणि मी यश मिळवलं. मी त्यावेळी शनिवार आणि रविवारी होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागलो. मी माझ्या लहानपणी अनेक बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्या सर्वच स्पर्धांमध्ये मी यशस्वी झालो असं नाही, पण मी माझे प्रयत्न सुरू ठेवले. प्रयत्न करण्यात मी कधीच संकोच केला नाही. याच अनुभवांनी मला चिकाटीचं मूल्य, मागील खेळांचा अभ्यास करण्याचं महत्त्व आणि सतत शिकण्याची गरज शिकवली."
विश्वनाथन आनंद पुढे म्हणाले की, "लक्षात ठेवा प्रत्येक महान खेळाडूची सुरुवात नवशिक्या म्हणून होत असते. प्रभुत्व मिळवण्याचा मार्ग कठोर परिश्रम, समर्पण आणि खेळावरील प्रेमानं मोकळा होतो. त्यामुळं तुम्ही प्रत्येक आव्हान स्वीकारा, प्रत्येक खेळातून काहीतरी नवीन शिका आणि नेहमी चांगलं बनण्याचा प्रयत्न करा."
अनेक पुरस्कारांनी सन्मानित : विश्वनाथन आनंद पद्मश्री पुरस्कारनं सन्मानित होणारे पहिले खेळाडू होते. त्यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, सोव्हिएत लँड नेहरू पुरस्कार आणि राष्ट्रीय नागरिक पुरस्कार, बुक ऑफ द इयर पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. आनंद यांनी 2000 मध्ये पहिल्यांदा जागतिक स्पर्धा जिंकली.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस म्हणजे काय? : आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) 1924 मध्ये पॅरिसमध्ये स्थापन झाल्यापासून दरवर्षी 30 जुलै रोजी जागतिक बुद्धिबळ दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची कल्पना युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) ने मांडली होती. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.
हेही वाचा
- गतविजेत्या भारतीय महिला ब्रिगेडचा जलवा; आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला लोळवत मिळवला दणदणीत विजय - INDW vs PAKW
- ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूचे पदक का काढून घेतले जाते? जाणून घ्या, 'डोपिंग'ची गंभीर समस्या - Paris Olympics 2024
- हार्दिकच नाही तर 'या' क्रिकेटपटूंचाही झालाय घटस्फोट; खेळाडूंची नावं वाचून बसेल धक्का! - Hardik Natasa Divorce