मुंबई T-20 World Cup : या वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ आधीच जाहीर झालाय. आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं याबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याच्यासोबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) मुख्य निवडकर्ते अजित आगरकर उपस्थित होते.
यापुर्वी अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळलोय : रोहित शर्माला आयपीएलमधील कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर मुंबई इंडियन्स (MI) फ्रँचायझीनं हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलंय, असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर रोहित म्हणाला की, "माझ्यासाठी हे काही नवीन नाही. मी यापूर्वीही अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे. मी आधी कर्णधार होतो. नंतर मी कर्णधार नव्हतो आणि आता कर्णधार आहे. तो जीवनाचा भाग आहे. सर्व काही आपल्या मार्गानं जाणार नाही. तो एक अद्भुत अनुभव आहे. माझ्या आयुष्यात यापूर्वीही मी कर्णधार नव्हतो आणि वेगवेगळ्या कर्णधारांच्या हाताखाली खेळलो होतो. त्याचा काही संबंध नाही. एक खेळाडू म्हणून जे आवश्यक आहे ते करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे आणि गेल्या एका महिन्यात मी ते करण्याचा प्रयत्न केलाय." यावर अजित आगरकर म्हणाले, "रोहित हा उत्तम कर्णधार आहे. 50 षटकांचा विश्वचषक आणि हा (टी-20) विश्वचषक या सहा महिन्यांच्या कालावधीत आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले यात शंका नाही. मला माहित आहे की हार्दिकनं काही मालिकांमध्ये नेतृत्व केलंय. पण रोहितनं कमाल केलीय."
रिंकूला बाहेर ठेवणं दुर्देवी : रिंकूबाबत बोलताना अजित आगरकर म्हणाले की, "रिंकू सिंह यानं काहीही चुकीचं केलं नाही. त्याला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय अतिशय कठीण होता. पण संतुलित संघ निवडायचा होता. आपल्याला अतिरिक्त गोलंदाजाची गरज होती. त्यामुळं रिंकू सिंहची 15 जणांमध्ये निवड झाली नाही. रिंकू सिंह याची निवड न होणं हे दुर्देवी आहे. रिंकू प्रमाणेच शुभमन गिल याचीही निवड करता आली नाही."
केएल राहुलची निवड का झाली नाही : पत्रकार परिषदेत केएल राहुलला विश्वचषक संघात स्थान का मिळालं नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आगरकर म्हणाले, 'केएल हा महान खेळाडू आहे. आम्ही मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचा विचार करत आहोत. केएल टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो. तर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळत आहे. संजू सॅमसनकडेही खाली खेळण्याची क्षमता आहे.' तर अष्टपैलू शिवम दुबेबाबत रोहित म्हणाला, 'आमची टॉप ऑर्डर चांगली कामगिरी करत आहे. मधल्या षटकांमध्ये ती भूमिका निभावून मोकळेपणानं खेळणारा खेळाडू आम्हाला हवाय. दुबेची आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे आम्ही निवड केलीय. आम्ही याबद्दल बोललो आणि निवड केली, परंतु अंतिम संघात त्याला स्थान मिळेल याची खात्री नाही.
टी-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, युजवराज, चहलपहल. संजू सॅमसन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.
टी-20 विश्वचषक गट :
- अ गट - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
- ब गट - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
- क गट - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
- ड गट - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ
हेही वाचा :