T20 World Cup 2024 BAN vs SA : आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आज बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (10 जून 2024) सामना होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना रोमांचक होणार आहे. कारण दोन्ही संघांनी आपले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या नजरा विजयाची हॅट्ट्रिक साधण्यावर असणार आहे. तर बांगलादेश संघ विजयाची पुनरावृत्ती करण्याचं लक्ष्य ठेवून मैदानात उतरणार आहे. दक्षिण आफ्रिकेला पहिला विजय श्रीलंकेविरुद्ध, तर दुसरा विजय नेदरलँडविरुद्ध मिळालाय. बांगलादेश संघाबद्दल बोलायचं झालं तर संघानं पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवलाय. दक्षिण आफ्रिका संघ आपल्या गटात 4 गुणांसह अव्वल तर बांगलादेश संघ 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँड्स आणि श्रीलंकेवर विजय नोंदवला असला तरी या दोन्ही सामन्यांमध्ये कमी धावसंख्येचा पाठलाग करताना त्यांचे फलंदाज संघर्ष करताना दिसले. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी मात्र आतापर्यंत चांगली कामगिरी केलीय. त्यामुळं त्यांच्या गोलंदाजीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. यात एनरिक नॉर्खिया, कागिसो रबाडा, मार्को जॅन्सन आणि ओटनीएल बार्टमनसारखे वेगवान गोलंदाज आणि केशव महाराजसारख्या अनुभवी फिरकी गोलंदाजांचा समावेश आहे.
बांगलादेश आणि आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड : 2007 पासून बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 फॉरमॅटमध्ये एकूण 8 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा आहे. आफ्रिका संघानं बांगलादेशविरुद्धचे सर्व सामने जिंकले आहेत. टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले आहेत. यामध्येही आफ्रिकन संघानं आपलं वर्चस्व कायम राखलय. बांगलादेश अजूनही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. अशा स्थितीत बांगलादेश संघ या मोठ्या प्रसंगी कोणत्याही किंमतीला विजयाच्या आशेनं मैदानात उतरू शकतो. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सर्वोच्च धावसंख्या 224 धावांची आहे.
आफ्रिकेच्या 'या' खेळाडूंवर असेल नजर
- रीझा हेंड्रिक्स : रीझा हेंड्रिक्सनं गेल्या 12 महिन्यांत दक्षिण आफ्रिकेसाठी शानदार फलंदाजी केली आहे. त्यानं 10 सामन्यात 292 धावा केल्या आहेत. त्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, या विश्वचषकातील 2 सामन्यांत त्याला केवळ 7 धावा करता आल्या.
- ओटनीएल बार्टमन : ओटनीएल बार्टमन गेल्या 12 महिन्यांत आफ्रिका संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. बार्टमॅननं या काळात 3 सामन्यात 8 विकेट घेतल्या आहेत. या विश्वचषकात 2 सामन्यात 5 बळी घेतलेत.
बांगलादेशच्या 'या' खेळाडूंवर असेल नजर
- तौहीद हृदय : तौहीद गेल्या 12 महिन्यांत संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यानं 17 सामन्यात 404 धावा केल्या आहेत. ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. या विश्वचषकातही तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. गेल्या सामन्यात त्यानं 40 धावांची इनिंग खेळली होती.
- मुस्तफिजुर रहमान : बांगलादेशचा अनुभवी गोलंदाज मुस्तफिझूर रहमान हा गेल्या 12 महिन्यांत संघाचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्यानं 14 सामन्यात 23 विकेट घेतल्या आहेत. या विश्वचषकातही तो संघासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय. त्यानं श्रीलंकेविरुद्ध 3 बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
दोन्ही संघ
- बांगलादेशचा संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तस्किन अहमद, लिटन दास, सौम्या सरकार, तन्झीद हसन तमीम, शाकिब अल हसन, तौहीद हृदय, महमूद उल्लाह रियाद, जाकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम , तन्झीम हसन साकीब.
- दक्षिण आफ्रिकेचा संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, मार्को जेन्सेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ॲनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिबेझ स्टॅम्ब्सी, ट्रिबेझ स्टॅम्ब्सी.
हेही वाचा