गयाना WI vs SA 2nd Test : दक्षिण आफ्रिकेनं गयाना इथं झालेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा 40 धावांनी पराभव केला. यासोबतच 2 कसोटी सामन्यांची मालिका 1-0 नं जिंकली. दोन्ही संघांमधील कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सलग 10वा कसोटी मालिका विजय आहे, ज्यात त्याचा फिरकी गोलंदाज केशव महाराजच्या विक्रमी कामगिरीनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संघाचे 7 फलंदाज शुन्यावर बाद झाल्यानंतर सामन्यात विजयाची नोंद करणं संघासाठी सोपं नसतं. पण, दक्षिण आफ्रिकेनं चांगली कामगिरी केली आणि केशव महाराजव्यतिरिक्त, कागिसो रबाडा आणि विआन मुल्डर यांनीही यात महत्त्वाची भूमिका बजावली.
🟢🟡Match Result
— Proteas Men (@ProteasMenCSA) August 17, 2024
🇿🇦South Africa wins by 40 runs.
The Sir Vivian Richards Trophy is ours! 🏆#WozaNawe #BePartOfIt #SAvWI pic.twitter.com/u7RY7yXbdB
7 फलंदाज शुन्यावर बाद, 92 वर्षांनंतर अशी परिस्थिती : दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजसमोर 263 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. कसोटी सामन्यात शिल्लक राहिलेला वेळ लक्षात घेता हे लक्ष्य मोठं नव्हतं. त्यामागचं कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे 7 फलंदाज शून्यावर बाद झाले. 92 वर्षांपूर्वीची भीषण परिस्थिती त्यांच्यासमोर आली आहे. खरंतर, दक्षिण आफ्रिकेसोबत 1932 नंतर प्रथमच असं घडलं आहे, जेव्हा एका कसोटी सामन्यात 7 फलंदाज आपलं खातं उघडू शकले नाहीत. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचे 4 फलंदाज बवूमा, मुल्डर, महाराज आणि रबाडा शुन्यावर झाले, तर दुसऱ्या डावात डेव्हिड, महाराज आणि बर्जर हे 3 फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही.
मुल्डर, रबाडा आणि महाराजची घातक गोलंदाजी : पहिल्या डावात केवळ 160 धावा आणि दुसऱ्या डावात 246 धावा करु शकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या स्कोअर बोर्डवर 7 फलंदाज शुन्यावर बाद झाल्याचा थेट परिणाम दिसून आला. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीनं फलंदाजांच्या अपयशाची भरपाई केली. मुल्डर, रबाडा आणि महाराज यांनी असा कहर केला की वेस्ट इंडिजचा संघ विजयाच्या लक्ष्यापासून 40 धावा दूर राहिला. पहिल्या डावातही त्यांना केवळ 144 धावाच करता आल्या.
वियान मुल्डर ठरला सामनावीर : दक्षिण आफ्रिकेसाठी वियान मुल्डर हा पहिल्या डावात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्यानं 9 षटकांत 32 धावांत 4 बळी घेतले. वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात 263 धावांचा पाठलाग करु शकला नाही आणि केवळ 222 धावांतच सर्वबाद झाला, तर प्रत्येकी 3 बळी घेणाऱ्या केशव महाराज आणि कागिसो रबाडाची भूमिका महत्त्वाची होती. दुसऱ्या डावात 2 बळी घेत, वियान मुल्डरनं सामन्यात एकूण 6 विकेट घेतल्या, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आलं.
केशव महाराज मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू : दुसरीकडं, दुसऱ्या कसोटीत एकूण 5 विकेट्स घेत केशव महाराजनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत 13 बळी घेतले. यासाठी त्याची 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीत सर्वाधिक 171 बळी घेणारा तो फिरकी गोलंदाजही ठरला.
हेही वाचा :
- 13 तास फलंदाजी करत खेळली 141 षटकं; क्रिकेटच्या 'या' दिग्गजासमोर गोलंदाजांनी केलं होतं 'त्राहिमाम', 'डॉन'लाही करावी लागली 'बॉलिंग' - WI vs SA Test
- भारतीय क्रिकेटमध्ये 16 वर्षांपूर्वी झालं होतं 'विराट' पदार्पण; 'क्रिकेटच्या देवा'चा विक्रम मोडला पण कधीही जिंकलं नाही 'आयपीएल' - 16 years of international cricket