सिंधुदुर्ग Sindhudurg Meritorious Player Award : महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग द्वारा सन 2023-24 चा 'सिंधुदुर्ग पुरुष गुणवंत खेळाडू' पुरस्कार सावंतवाडी येथील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याला जाहीर झाला आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आयुषला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
राष्ट्रीय खेळाडू म्हणून घोषित : राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत आयुषने सुवर्ण पदक मिळवून भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व केलं होतं. राज्यस्तरीय स्पर्धेत आयुष याला 400 पैकी 378 गुण मिळाले होते. यापूर्वी दिल्ली आणि भोपाळ येथे झालेल्या शूटींग असोसिएशनच्या स्पर्धेत आयुषला 'राष्ट्रीय खेळाडू' घोषित करण्यात आलंय.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत आयुषची निवड : महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनसह महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. या स्पर्धेत नेमबाजी या खेळाचाही समावेश करण्यात आला. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजली भागवत, तेजस्विनी सावंत या सहभागी झाल्या होत्या. यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयुष दत्तप्रसाद पाटणकर याची 10 मीटर एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारासाठी ऑलिम्पिक गेम्ससाठी निवड करण्यात आली होती. या प्रकारात एकूण 49 पुरुष व 36 महिला असे एकूण 85 खेळाडूंची निवड करण्यात आली होती. यामध्ये अंजली भागवत, तेजस्विनी सावंत यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबत आयुषची निवड होणं कौतुकास्पद बाब आहे.
बालेवाडी, पुणे येथे ही स्पर्धा घेण्यात आली होती. यापूर्वी आयुषने भोपाळ येथे झालेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये 600 पैकी 563 गुण मिळवून भारतीय निवड चाचणीसाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. याच निकषावर त्याची महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली. सावंतवाडी येथील उपरकर शूटिंगचे कांचन उपरकर यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा