मुंबई Indian Street Premier League : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत बुधवारी टेनिस बॉल टी-20 क्रिकेट टूर्नामेंट अर्थात 'इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग'च्या पहिल्या हंगामातील टीमच्या लिलावाचे निकाल जाहीर झाले. यावेळी सचिन तेंडुलकरनं आपल्या क्रिकेट करिअरच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.
लहानपणीच मिळाले स्ट्रेट ड्राइव्हचे धडे : सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमध्ये चॅलेंज कसं स्वीकारायचं आणि आपल्या खेळावर लक्ष कसं केंद्रित करायचं, याविषयी मार्गदर्शन केलं. सचिन म्हणाला की, आम्ही जेथे राहात होतो तेथे आम्हाला इमारतीच्या मधोमध खेळावं लागायचं. असा एकही दिवस जात नव्हता, ज्या दिवशी कोणाच्या खिडकीच्या काचा फुटल्या नाहीत. मात्र मला घरातून प्रोत्साहन मिळत होतं. मला मोठा भाऊ अजित यानं खूप मदत केली. सचिन तेंडुलकर हा त्याच्या स्ट्रेट ड्राइव्ह शॉटसाठी ओळखला जातो. या शॉटची सवय त्याला या दरम्यान लागल्याचं सचिननं सांगितलं.
करिअरची सुरुवात टेनिस बॉलनं झाली : पुढे बोलताना सचिन म्हणाला की, त्याच्या क्रिकेट करिअरची सुरुवात टेनिस बॉलनं झाली. त्याला त्याच्या बहिणीनं पहिली बॅट दिली होती. सचिन शिवाजी पार्क येथे क्रिकेटचा सराव करत असे. त्यावेळेस आचरेकर सर त्याला मार्गदर्शन करत असत. सचिननं यावेळची एक आठवण सांगितली. सचिन म्हणाला की, "एकदा मी सराव सामन्यांमध्ये सलग दोनवेळा शून्यावर बाद झालो. त्यानंतरच्या सामन्यात मी एका रनावर बाद झालो. जेव्हा मी घराकडे निघालो होतो तेव्हा मला एक रन केल्याचा खूप आनंद झाला होता. त्या एका धावेनं माझी वाटचाल बदलली."
आव्हानांना स्वीकारण्याचा सल्ला : सचिननं क्रिकेट करिअरमध्ये कायम आव्हानांना स्वीकारण्याचा आणि पुढे जात राहायचा सल्ला दिला. "आव्हानांवर सोल्युशन काढायला शिका. खचून न जाता पुढे जायला शिका. क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी मला देखील वाट पाहावी लागली होती", असं सचिन म्हणाला.
काय आहे आयएसपीएल : इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग 2024 चा हा पहिला हंगाम आहे. या स्पर्धेतील सर्व सामने टेनिस बॉलनं खेळले जातील. हे सामने 10 ओव्हरचे असून, 'स्ट्रीट टू स्टेडियम' अशी स्पर्धेची टॅग लाईन आहे. हे सर्व सामने 6 ते 15 मार्च दरम्यान मुंबईत खेळले जातील. आयएसपीएल टीमच्या लिलावाचे निकाल आज जाहीर करण्यात आले. स्पर्धेतील सर्व 6 संघांसाठी 1165 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली.
आयएसपीएल टीमचे मालक
- मुंबई टीम - अमिताभ बच्चन, 205.6 कोटी
- श्रीनगर टीम - अक्षय कुमार, 251 कोटी
- हैदराबाद टीम- राम चरण, 200 कोटी
- चेन्नई टीम - सूर्या शिवकुमार, 163.6 कोटी
- बेंगलुरु टीम - हृतिक रोशन, 225 कोटी
- कोलकाता टीम - सैफ अली खान आणि करीना कपूर, 120 कोटी