बीड Sachin Dhas : दुष्काळग्रस्त बीड जिल्हा आता खेळाडूंचा बालेकिल्ला म्हणूनही ओळखला जातोय. जिल्ह्याचं नाव देशाच्या शिखरावर घेऊन जाणारे अनेक खेळाडू याच बीड जिल्ह्यानं महाराष्ट्रासह देशाला दिलेले आहेत. बीडच्या सचिन धसची भारतीय अंडर 19 क्रिकेट संघात निवड झाल्यापासूनच तो क्रिकेटच्या मैदानावर चमकदार कामगिरी करतोय. मंगळवारी झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात सचिनच्या खेळीच्या बळावर संघानं अंतिम सामन्यात धडक मारलीय. यानंतर सचिनच्या कुटुंबियांच्या त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.
सचिननं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करावं : सचिनच्या खेळीनंतर सचिनची आई 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाली, "सचिनची अंडर 19 क्रिकेट संघामध्ये निवड झाल्यावर सचिनचे कोच अझर यांच्यासह बीड क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याचबरोबर बीसीसीआयचे आम्ही आभार मानतो. सचिननं भारतीय क्रिकेट संघात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्याला शुभेच्छा देतो आणि सचिन एक चांगला खेळाडू म्हणून भारतीय संघात खेळलाय. त्याचबरोबर आता त्यानं भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करावं, अशी आमची इच्छा आहे."
लहानपणापासूनच क्रिकेटची गो़डी : मी व माझे पती दोघेही खेळाडू असल्यामुळं आम्हाला आमच्या मुलाला खेळाडू बनवायचं होतं आणि लहानपणापासूनच त्याच्यामध्ये ते गुण अवगत झाले. वयाच्या 4 वर्षापासून त्याला क्रिकेटची आवड लागली आणि लहानपणापासूनच त्या आवडीमुळं तो अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळू लागला. त्यामुळं त्याचे अनेक क्रिकेटचे खेळ यशस्वी झाल्याचं त्याची आई सुरेखा धस यांनी सांगितलंय.
सचिन धसची दमदार फलंदाजी : भारतीय संघानं उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. मात्र यानंतर सचिन धसच्या नावाची सर्वाधिक चर्चा रंगली. सचिनच्या खेळीनं सर्वांनाच प्रभावित केलंय. यापूर्वीही सचिन धसनं नेपाळविरुद्धच्या सामन्यात 117 धावांची खेळी केली होती. एकंदरीतच सचिन आणि उदयनं या विश्वचषकात स्वतःला सिद्ध केलंय. आगामी काळात सचिन आणि उदय भारतीय संघावरही दावा सांगू शकतात, असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. दोघांनीही नेपाळविरुद्धच्या सामन्यात 200 धावांहून अधिक धावांची भागीदारी केली होती. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या जोडीनं 187 चेंडूत 171 धावांची भागीदारी करुन प्रतिस्पर्धी संघाच्या तावडीतून भारतीय संघाची सुटका करत भारतीय संघाला विजय मिळवून दिलाय.
19 वर्षांखालील विश्वचषकात सचिन धसची कामगिरी : 2024 च्या अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत सचिन धस हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फंलदाज आहे. आतापर्यंत त्यानं 6 सामन्यांत 73.50 च्या सरासरीनं 294 धावा केल्या आहेत. तर भारताचाच फलंदाज मुशीर खान पहिल्या क्रमांकावर असून त्यानं 6 सामन्यात 67.60 च्या सरासरीनं 338 धावा केल्या आहेत.
हेही वाचा :