नवी दिल्ली Rohan Bopanna : भारताचा अनुभवी टेनिस खेळाडू रोहन बोपन्नानं ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ऐतिहासिक कामगिरी गेली आहे. बोपन्नानं त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेनसह पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं.
ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू : शनिवार, 27 जानेवारीला मेलबर्न पार्क येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित रोहन-एब्डेन जोडीनं इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रे वावासोरी जोडीचा 7-6 (0), 7-5 असा पराभव केला. या विजयासह, 43 वर्षीय रोहन बोपन्ना ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू ठरला आहे. यापूर्वीचा विक्रम नेदरलँड्सच्या जीन-ज्युलियन रॉजरच्या नावावर होता. त्यानं 40 वर्ष आणि 9 महिने वयात 2022 फ्रेंच ओपन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं होतं.
अटीतटीच्या सामन्यात विजय : अंतिम सामन्यात इटालियन खेळाडूंनी बोपन्ना-एब्डेन जोडीला कडवी टक्कर दिली. हा सामना 1 तास 39 मिनिटं चालला. पहिला सेट टायब्रेकरवर गेला. टायब्रेकरमध्ये बोपन्ना-एबडेन जोडीनं एकही गेम गमावला नाही आणि सेट जिंकला. दुसरा सेट देखील अटीतटीचा झाला. या सेटच्या 11व्या गेममध्ये बोपन्ना-एबडेन जोडीनं इटालियन खेळाडूंची सर्विस ब्रेक केली आणि सामना आपल्याकडे झुकवला.
पुरुष दुहेरीचं पहिलंच ग्रँडस्लॅम विजेतेपद : रोहन बोपन्नाचं हे पुरुष दुहेरीचं पहिलंच ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी, बोपन्नाची सर्वोत्तम कामगिरी 2010 आणि 2023 मध्ये होती. तेव्हा त्यानं यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. याशिवाय बोपन्नानं फ्रेंच ओपन (2022) आणि विम्बल्डन (2013, 2015, 2023) स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. रोहन बोपन्नानं मिश्र दुहेरीत फ्रेंच ओपन 2017 चं विजेतेपद पटकावलं आहे.
हे वाचलंत का :