चंदीगड IPL 2024 PBKS vs RR : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या 27व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं (RR) पंजाब किंग्जचा (PBKS) तीन गडी राखून पराभव केलाय. मुल्लानपूर येथील यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी झालेल्या या सामन्यात राजस्थानसमोर विजयासाठी 148 धावांचं लक्ष्य होतं. जे त्यांनी शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पूर्ण केलं. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सचा सहा सामन्यांमधला हा पाचवा विजय असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहेत. दुसरीकडं पंजाब किंग्जचा सहा सामन्यांतील हा चौथा पराभव ठरलाय.
शेवटच्या षटकाचा थरार : सामन्याच्या शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 10 धावा करायच्या होत्या. अर्शदीप सिंगनं त्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर एकही धाव दिली नाही. त्यानंतर शिमरॉन हेटमायरनं तिसऱ्या चेंडूवर चौकार मारुन दबाव कमी केला. हेटमायरनं चौथ्या चेंडूवर दोन धावा केल्या. त्यानंतर हेटमायरनं पाचव्या चेंडूवर षटकार ठोकत राजस्थानला विजय मिळवून दिला.
जैस्वालची 'यशस्वी' खेळी : राजस्थान रॉयल्ससाठी 'इंम्पॅक्ट प्लेअर' म्हणून आलेल्या यशस्वी जैस्वालनं सर्वाधिक 39 धावा केल्या. ज्यात चार चौकारांचा समावेश होता. तर हेटमायरनं 10 चेंडूत 27 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. हेटमायरनं आपल्या खेळीत तीन षटकार आणि एक चौकार लगावला. तनुष कोटियननं 24 धावांची तर रियान परागनं 23 धावांची खेळी केली. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडा आणि सॅम करन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
आशुतोष शर्माची आक्रमक खेळी : तत्पुर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जनं आठ गडी गमावून 147 धावा केल्या. पंजाबसाठी 'इंम्पॅक्ट प्लेअर' म्हणून मैदानात आलेल्या आशुतोष शर्मानं 16 चेंडूत 31 धावांची शानदार खेळी केली. या खेळीत आशुतोषनं तीन षटकार आणि एक चौकार लगावला. तर जितेश शर्मानं 29 धावांची तर लियाम लिव्हिंगस्टोननं 21 धावांची खेळी केली. बाकीचे फलंदाज काही विशेष कामगिरी करु शकले नाहीत. राजस्थान रॉयल्सकडून केशव महाराज आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर कुलदीप सेन, युझवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दोन्ही संघात मोठे बदल : या सामन्यासाठी दोन्ही संघात मोठे बदल करण्यात आले होते. पंजाब किंग्जचा नियमित कर्णधार शिखर धवन किरकोळ दुखापतीमुळं या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. धवनच्या अनुपस्थितीत सॅम करननं पंजाब किंग्जची धुरा सांभाळली. दुसरीकडे, जॉस बटलर आणि रविचंद्रन अश्विन राजस्थान रॉयल्सकडून हा सामना खेळले नाहीत. बटलर 100 टक्के तंदुरुस्त नव्हता, तर अश्विनला किरकोळ दुखापत झाली होती.
हेही वाचा :