हैदराबाद Vinesh Phogat Disqualification Hearing : भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनलला अपात्र ठरली होती. 50 किलो वजनी गटात फायनलमध्ये तिचं वजन 100 ग्रॅम जास्त भरलं होतं. त्यामुळं तिच सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न हुकलं. ऑलिम्पिक समितीच्या या निर्णयावर भारतानं आव्हान दिलं होतं. या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून, आता निकालाची तारीख 'CAS' नं पुढं ढकलली आहे.
'या' तारखेला लागणार निकाल : ऑलिम्पिक समितीच्या निर्णयावर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं 'सीएएस'कडं दाद मागितली होती. या प्रकरणाचा निकाल आज (11 ऑगस्ट) येणं अपेक्षित होतं. मात्र, निकाल पुढं ढकलण्यात आला आहे. हा निकाल आता 13 ऑगस्टच्या रात्री साडेनऊ वाजेपर्यंत लागू शकतो, अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं दिली.
विनेशच्या काकांनी दिली प्रतिक्रिया : भारतीय कुस्तीपटू महावीर फोगट म्हणाले की, ''आम्ही निर्णयाची वाट बघत आहोत. तीन दिवस झाले आहेत. मला विश्वास आहे की निर्णय आमच्या बाजूनं लागेल. 13 ऑगस्टला भारतातील जनतेला चांगली बातमी मिळेल, तेव्हा आम्हाला आणि समस्त भारतवासियांना आनंद होईल.'' ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत वजन मर्यादेपेक्षा किंचित जास्त असल्यामुळं अपात्र ठरलेल्या विनेशनं घटनेनंतर कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तिनं उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव करुन सुवर्णपदकापर्यंत मजल मारली होती. सुवर्णपदकासाठी तिची युनायटेड स्टेस्टसच्या सारा अॅन हिल्डब्रॅंडशी लढत होणार होती. परंतु, वजन मर्यादेच्या उल्लंघनामुळं तिला अपात्र ठरवण्यात आलं.
काय आहे मागणी? : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटनं अपीलमध्ये, लोपेझसोबत संयुक्त रौप्यपदक देण्याची मागणी केली आहे. कारण मंगळवारी झालेल्या सामन्यांदरम्यान तिचं वजन निर्धारित मर्यादेत होतं. विनेशची बाजू सुप्रसिद्ध ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि सिंघानिया यांनी मांडली.
ऑलिम्पिक प्रकरण हाताळण्यासाठी 'सीएएस' : पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रकरणं हाताळण्यासाठी 'सीएएस' स्थापन करण्यात आलं आहे. क्रीडा विश्वातील कोणत्याही वादावर तोडगा काढण्याचं काम हा विभाग करतो. 'सीएएस'मध्ये 87 देशांतील 300 मध्यस्थ आहेत.
हेही वाचा