Paris Olympics 2024 : माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी दिग्गज बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडलच्या सामन्यात बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनच्या पराभवानंतर प्रकाश पादुकोण यांनी खेळाडूंना जबाबदार धरलं होतं. मोठ्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना दबाव सहन करायला शिकलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होतं. अनेक खेळाडूंनी प्रकाश पादुकोण यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.
सुनील गावसकर यांचं समर्थन : प्रकाश पादकुोण यांच्या वक्तव्यावर बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पानं टीका केली होती. पण आता सुनील गावसकर यांनी प्रकाश पादुकोण यांना पाठिंबा दर्शवला आहे. "आपल्या देशानं बहाणे बनवण्याच्या कलेत नैपुण्य मिळवलं आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला एकही सुवर्णपदक मिळालं नाही. भारताला 1 रौप्य आणि 5 कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. प्रकाश पादुकोण हे शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. ते नेहमी प्रकाशझोतापासून दूर राहतात. त्यांचं वक्तव्य खेळाप्रती त्यांच्या असलेल्या प्रेमातून आलं." असं सुनील गावसकर यांनी म्हटलंय.
बहाणे बनवण्यात सुवर्णपदक जिंकतो : "बहाणे बनवण्यात आपला देश प्रत्येक वेळी सुवर्णपदक जिंकतो. खेळाडूंना असोसिएशन आणि सरकारकडून प्रत्येक गोष्टीची मदत मिळते. त्यामुळे कामगिरी सुधारण्याची जबाबदारी ही खेळाडूंची असते. खेळाडू आपल्या कामगिरीची जबाबदारी घेणार नाहीत तर कोण घेणार? काही जण म्हणतात की वेळ खराब होती, पण असं कधी पर्यंत म्हणत राहणार? खेळाडूंवर सार्वजनिकरित्या केलेल्या टीकेचा प्रभाव पडतो, इतर कोणत्या गोष्टींचा नाही." असं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे.
अश्विनी पोनप्पानं व्यक्त केली होती नाराजी : जर एखादा खेळाडू जिंकला तर सर्वजण श्रेय घेण्यासाठी पुढे येतात आणि जर खेळाडू हरला तर त्याचा दोष फक्त खेळाडूला देतात? प्रशिक्षकांना जबाबदार का धरलं जात नाही? विजयाचे श्रेय घेणारा तो पहिला माणूस असतो पण तो आपल्या खेळाडूंच्या पराभवाची जबाबदारी का घेत नाही? या शब्दांत बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोनप्पाने 'इन्स्टाग्राम' पोस्टमधून आपली नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा
- 'माझं वजन 100 ग्रॅमने वाढलं कारण...' विनेश फोगाटचा मोठा खुलासा - Paris Olympic 2024
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत खासदारानं जिंकलं 'कांस्यपदक'; टोकियो आणि रिओ ऑलिम्पिकमध्येही जिंकली आहेत पदकं - Paris Olympic 2024
- विनेश फोगटच्या आधी 'या' खेळाडूला CAS कोर्टातून मिळाला न्याय; अमेरिकन खेळाडूकडून जिंकलं 'कांस्यपदक' - paris olympic 2024