पॅरिस Paris Olynmpics 2024 Badminton : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं आज (31 जुलै) दमदार कामगिरी केली. लक्ष्यनं जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. लक्ष्यनं हा सामना जिंकून आता उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. हा विजय 23 वर्षीय लक्ष्यसाठी खूप खास आहे, कारण त्यानं त्याच्यापेक्षा क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या खेळाडूला पराभूत केलं. क्रिस्टीला ऑलिम्पिकमध्ये तिसरं मानांकन देण्यात आलं आहे. लक्ष्यनं बॅडमिंटन पुरुष एकेरी गटातील गट L सामन्यात चमकदार कामगिरी केली.
दोन सरळ सेटमध्ये विजय : लक्ष्य आणि क्रिस्टी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. जिथं लक्ष्यनं हा सामना पूर्णपणे जिंकला. दोघांमधील हा सामना 51 मिनिटं चालला. पहिल्या सेटमध्ये लक्ष्यनं इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा 21-18 असा रोमांचकारी पराभव केला. क्रिस्टीविरुद्धचा पहिला सेट जिंकण्यासाठी लक्ष्यला 28 मिनिटं लागली. तर दुसऱ्या सेटमध्ये लक्ष्यनं क्रिस्टीचा अवघ्या 23 मिनिटांत 21-12 असा पराभव केला. उपउपांत्यपूर्व फेरीत सेनचा सामना भारताच्याच एचएस प्रणॉयशी होण्याची शक्यता आहे. प्रणॉयचा सामना व्हिएतनामच्या ले डक फाटशी होणार आहे.
याआधी बेल्जियमच्या ज्युलियन कॅरेजचा केला पराभव : लक्ष्य सेन आपलं पहिलंच ऑलिम्पिक खेळत आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पहिल्या सामन्यात त्यानं केविन कॉर्डनचा पराभव केला. पण ग्वाटेमालाच्या खेळाडूनं दुखापतीमुळं ऑलिम्पिकमधून माघार घेतली. यानंतर त्याचे सर्व निकाल ‘डिलीट’ करण्यात आले. अशा प्रकारे लक्ष्य सेनचा पहिला विजय व्यर्थ गेला. यानंतर लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या L गटात बेल्जियमच्या ज्युलियन कॅरेजचा पराभव केला. लक्ष्यची सध्याची क्रमवारी 22 आहे.
पीव्ही सिंधूनंही मिळवला विजय : याशिवाय महिला एकेरीत पीव्ही सिंधूनं इस्टोनियन खेळाडूचा सरळ सेटमध्ये पराभव केला. तिनं 21-5 आणि 21-10 असा सहज विजय मिळवला. या विजयासह ती राऊंड ऑफ 16 (उपउपांत्यपूर्व फेरी) साठी पात्र ठरली आहे.
हेही वाचा :