पॅरिस Paris Olympics 2024 : जगातील सर्वात मोठं क्रीडा महोत्सव म्हणजेच ऑलिम्पिक सध्या पॅरिसमध्ये होत आहे. ऑलिम्पिक खेळात पदक जिंकण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. पण यावेळी ऑलिम्पिकमध्ये अनेक वादही पाहायला मिळत आहेत, ज्यात महिला बॉक्सिंग स्पर्धा सर्वाधिक चर्चेत आहे. महिलांच्या या स्पर्धेत पुरुष खेळाडूही खेळत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या सगळ्या दरम्यान ऑलिम्पिकमध्ये एक असा पराक्रम पाहायला मिळाला, ज्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ग्रेट ब्रिटनच्या एका खेळाडूनं पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धांमध्ये पदक जिंकून इतिहास रचला आहे.
Olympic history!
— Team GB (@TeamGB) August 3, 2024
Coxswain Henry Fieldman has become the first person to win an Olympic medal in both men’s and women’s events.
#Paris2024 pic.twitter.com/QW8OBlNN03
ऑलिम्पिकच्या इतिहासात असं प्रथमच घडलं : ग्रेट ब्रिटनचा रोइंग ॲथलीट हेन्री फील्डमॅनचं नाव ऑलिम्पिक इतिहासात नोंदवलं गेलं आहे. कारण हेन्री फील्डमॅन हा पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारातील स्पर्धांमध्ये पदक जिंकणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटनच्या महिला रोइंग संघासह रौप्य पदक जिंकलं आहे. यापूर्वी त्यानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष संघासह कांस्यपदक जिंकलं होतं. हेन्री फील्डमॅनच्या या आश्चर्यकारक पराक्रमाचं कारण म्हणजे रोइंग खेळाचे नियम आहेत.
हेन्री फील्डमननं दोन्ही प्रकारात कशी जिंकली पदकं : हेन्री फील्डमॅन रोइंगमध्ये कॉक्सस्वेनची भूमिका निभावतो. रोइंगमध्ये संपूर्ण संघाचं नेतृत्व करणाऱ्या ॲथलीटला कॉक्सवेन म्हणतात. या खेळाच्या दोन्ही श्रेणींमध्ये, 8 खेळाडूंच्या रोइंग क्रूमधील कॉक्सस्वेन पुरुष किंवा महिला असू शकतात. म्हणजे महिला संघात एक पुरुष कॉक्सवेन आणि पुरुषांच्या संघात एक महिला कॉक्सस्वेनही असू शकते. याच नियमामुळं हेन्री फील्डमननं दोन्ही प्रकारात पदकं जिंकण्याचा पराक्रम केला आहे. हा नियम 2017 मध्ये रोइंगमध्ये लागू करण्यात आला होता.
इतिहास रचल्यानंतर फील्डमॅन काय म्हणाला : ऐतिहासिक कामगिरीनंतर फील्डमॅन म्हणाला, टोकियो ऑलिम्पिकमध्ये आमच्यासाठी सर्व काही कठीण होतं. कारण त्यावेळी कोरोना सुरु होता. पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आमच्या संघानं चांगली कामगिरी केली. आम्ही एका संघाप्रमाणे खेळलो आणि आम्ही यशस्वी झालो. स्त्री-पुरुषांच्या स्पर्धा वेगळ्या होत्या. मात्र सर्वांनी मिळून सहकार्य केलं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनच्या महिला संघानं 0.67 सेकंदात शर्यत पूर्ण करुन रौप्यपदक जिंकलं. तर यात कॅनडाच्या संघानं सुवर्णपदक पटकावलं आहे.
हेही वाचा :