हॅमिल्टन NZ vs SA Test : न्यूझीलंडनं दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केलाय. या विजयासह कसोटी क्रिकेटच्या इतिहासात न्यूझीलंड संघानं प्रथमच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका जिंकण्यात यश मिळविलंय. दुसरा कसोटी सामना जिंकून न्यूझीलंडनं 2-0 नं मालिका जिंकलीय.
न्यूझीलंडनं रचला इतिहास : हॅमिल्टन इथं खेळली जाणारी दुसरी कसोटी जिंकण्यासाठी न्यूझीलंडला 267 धावांची गरज होती. केन विल्यमसनच्या दमदार शतकामुळं न्यूझीलंडनं हे लक्ष्य सहज गाठलंय. न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
किवींची 92 वर्षांची प्रतिक्षा संपली : न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिली कसोटी मालिका 1932 साली खेळली गेली. दक्षिण आफ्रिकेनं दोन सामन्यांची ही कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली होती. तेव्हापासून, म्हणजे गेल्या 92 वर्षांत, न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या 18 कसोटी मालिकांपैकी एकही मालिका जिंकली नव्हती. यातील चार कसोटी मालिका अनिर्णित राहिल्या तर दक्षिण आफ्रिकेनं 14 मालिका जिंकल्या. आज पहिल्यांदाच किवी संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका विजय मिळवलाय.
केन विल्यमसननं 32वं शतक झळकावत रचला इतिहास : या सामन्यात न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विल्यमसननं ऐतिहासिक कामगिरी केलीय. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात न्यूझीलंडसाठी केन विल्यमसननं 260 चेंडूत नाबाद 133 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्यानं सलग सात कसोटी सामन्यात शतक झळकावलंय. या खेळीसह विल्यमसननं अनेक मोठे विक्रमही मोडीत काढले आहेत.
सचिन तेंडुलकर आणि गावस्करांना टाकलं मागे : या खेळीसह आता केन विल्यमसन हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 32 शतकं झळकावणारा फलंदाज ठरलाय. त्यानं सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर या दिग्गज फलंदाजांना मागे टाकत नवा विक्रम रचलाय. विल्यमसननं आपल्या कसोटी कारकिर्दीतील 32वे शतक झळकावण्यासाठी 172 डाव घेतले. तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनं 174 डावांत 32 कसोटी शतकं झळकावली. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगनं 176 डावांत ही कामगिरी केली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं 32 शतकं झळकावण्यासाठी 179 डाव घेतले होते.
हेही वाचा :