मुंबई Unique Cricket Records : क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे धावबाद होणं ही फलंदाजासाठी सर्वात निराशाजनक आणि लाजिरवाणी गोष्ट असते, तसंच गोलंदाजासाठी एका षटकांत 6 पेक्षा जास्त चेंडू टाकणं ही लाजीरवाणी परिस्थिती असते. क्रिकेटच्या इतिहासात असे 5 गोलंदाज आहेत, ज्यांनी एका षटकात सर्वाधिक चेंडू टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम केला आहे. क्रिकेटच्या नियमांनुसार एका षटकांत 6 कायदेशीर चेंडू टाकणं बंधनकारक आहे. मात्र असे 5 गोलंदाज आहेत, ज्यांनी एका षटकात इतके चेंडू टाकले की कोणी कल्पनाही करु शकत नाही.
- बर्ट व्हॅन्स (न्यूझीलंड)
क्रिकेट सामन्याच्या एकाच षटकात सर्वाधिक चेंडू टाकण्याचा लज्जास्पद विक्रम न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज बर्ट व्हॅन्सच्या नावावर आहे. 20 फेब्रुवारी 1990 रोजी, न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज बर्ट व्हॅन्सनं कँटरबरीविरुद्धच्या प्रथम श्रेणी सामन्यातील एका षटकात थोडे-थोडके नव्हे तर तब्बल 22 चेंडू टाकले. वेलिंग्टनकडून खेळताना बर्ट वन्सनं हा लज्जास्पद विक्रम केला होता. न्यूझीलंडकडून चार कसोटी सामने खेळणारा माजी क्रिकेटपटू बर्ट व्हॅन्सच्या नावावर क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडं षटकही टाकण्याचा विक्रम आहे. त्यानं आपल्या या 22 चेंडूच्या षटकात 77 धावा दिल्या.
- मोहम्मद सामी (पाकिस्तान)
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद सामीच्या नावावर क्रिकेट सामन्याच्या एका षटकात 17 चेंडू टाकण्याचा लाजिरवाणा विक्रम आहे. विशेष म्हणजे त्यानं आंतरराष्ट्रीय सामन्यात हा लाजिरवाणा विक्रम केला. मोहम्मद सामीनं 2004 मध्ये आशिया चषकादरम्यान बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एकाच षटकात 17 चेंडू टाकले होते. यादरम्यान मोहम्मद सामीनं 7 वाईड आणि 4 नो बॉल टाकले होते.
- कर्टली ॲम्ब्रोस (वेस्ट इंडीज)
क्रिकेट सामन्याच्या एका षटकात 15 चेंडू टाकण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा दिग्गज वेगवान गोलंदाज कर्टली ॲम्ब्रोसच्या नावावर आहे. 1997 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ इथं खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात कर्टली ॲम्ब्रोसनं एका षटकात एकूण 15 चेंडू टाकले होते. त्यादरम्यान कर्टली ॲम्ब्रोसनं एक-दोन नव्हे तर 9 नो बॉल टाकले होते.
- डॅरेल टफी (न्यूझीलंड)
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेल टफीनं 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एका षटकात 14 चेंडू टाकले होते. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेल टफीनं यात 4 वाईड बॉल आणि 4 नो बॉल टाकले.
- स्कॉट बॉसवेल (इंग्लंड)
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्कॉट बॉसवेलनं 2001 मध्ये C&G ट्रॉफी सामन्यात लीसेस्टरशायरकडून खेळताना, सॉमरसेटविरुद्धच्या उपांत्य सामन्यात एका षटकांत 14 चेंडू टाकले होते. एका षटकात सर्वाधिक चेंडू टाकणारा तो इंग्लंडचा गोलंदाज आहे.
हेही वाचा :