नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होतंय. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंनी मतदान केलंय. लोकशाहीच्या या उत्सवात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कपिल देव आणि गौतम गंभीर सहभागी होत यांनी मतदानाचा हक्क बजावला तसंच मतदान करण्याचं आवाहनंही केलंय.
कपील देवनं केलं मतदान : 1983 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देवनं दिल्लीत मतदान केल. यानंतर ते म्हणाले, "मला खूप आनंद झाला की आपण लोकशाहीत आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मतदारसंघासाठी योग्य लोकांची निवड करायची आहे. सरकार काय करु शकतं यापेक्षा आपण काय करु शकतो हे महत्त्वाचं आहे."
गौतम गंभीरनं बजावला मतदानाचा हक्क : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) मार्गदर्शक गौतम गंभीरनंही दिल्लीतील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यानं जनतेला जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं. तो म्हणाला की मला सांगायचं आहे की, कृपया बाहेर या आणि विकास, प्रामाणिकपणा आणि देशाच्या कल्याणासाठी मतदान करा. देशासाठी काम करणारं, समाजासाठी काम करणारं आणि प्रामाणिकपणे काम करणारं सरकार आलं पाहिजे. तो यावेळी निवडणूक लढवत नसला तरी गंभीरनं 2019 मध्ये पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून बंपर विजय मिळवला होता. तेव्हा गंभीरनं काँग्रेसचे उमेदवार अरविंदर सिंग लवली यांचा 3 लाख 91 हजार 222 मतांनी पराभव केला होता.
एम एस धोनीचं रांचीत सहकुटुंब मतदान : तसंच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं त्याच्या कुटुंबासह रांचीमधील मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. धोनी आयपीएलच्या चालू हंगामात खेळताना दिसला. धोनीनं 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं तीन आयसीसी विजेतेपदे जिंकली आहेत.
हेही वाचा :