धर्मशाळा James Anderson Scripts History : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचलाय. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी पूर्ण केलेत. भारताविरुद्धच्या धर्मशाळा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्यानं ही कामगिरी केलीय. जेम्स अँडरसनची कसोटीत 700वी विकेट कुलदीप यादवची होती. विशेष बाब म्हणजे जेम्स अँडरसन हा 700 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच वेगवान गोलंदाज असून वयाच्या 41 व्या वर्षी त्यानं हा विक्रम केलाय.
या मालिकेत आतापर्यंत 10 बळी : भारताविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वीच जेम्स अँडरसन हा इतिहास रचेल, अशी अपेक्षा होती. ही मालिका सुरु होण्यापूर्वी जेम्स अँडरसनच्या खात्यात 690 कसोटी विकेट्स होत्या. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. मात्र विशाखापट्टणम कसोटीत त्याला संघात स्थान मिळालं. तिथं त्यानं 5 बळी घेतले. यानंतर जेम्स अँडरसननं राजकोट कसोटीत एक विकेट घेतली, तर रांची कसोटीत त्यानं 2 बळी घेतले.
जेम्स अँडरसनची क्रिकेट कारकीर्द : जेम्स अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून तो 187* सामने खेळला आहे. फक्त क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं अँडरसनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. सचिनच्या नावावर 200 कसोटी सामने आहेत. जेम्स अँडरसननं आतापर्यंत 194 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 269 विकेट्स आहेत. तर त्यानं 19 टी-20 सामन्यांमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट :
- मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010): 133 कसोटी, 800 विकेट्स
- शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007): 145 कसोटी, 708 विकेट्स
- जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2024): 187* कसोटी, 700* विकेट्स
- अनिल कुंबळे (भारत 1990-2008): 132 कसोटी, 619 विकेट्स
- स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड 2007-2023): 167 कसोटी, 604 विकेट्स
- ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया 1993-2007): 124 कसोटी, 563 विकेट्स
हेही वाचा :