हैदराबाद SRH vs RR IPL 2024 : सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल यांच्या आयपीएलचा 50 वा सामना गुरुवारी हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर पार पडला. या सामन्यात सनराझर्स हैदराबाद संघानं राजस्थान रॉयल संघावर एका धावेनं रोमांचक विजय संपादन केला. अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारनं बळी मिळवत हैदराबाद संघाला विजय मिळवून दिला. हैदराबाद संघानं प्रथम फलंदाजी करत नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हीस हेडच्या जोरदार खेळीच्या जोरावर विजयासाठी राजस्थान रॉयल संघाला 202 धावांचं लक्ष्य दिलं होतं. मात्र राजस्थान संघ 7 बळी गमावून 200 धावाच करू शकला.
हैदराबादनं राजस्थान संघाला दिलं 202 धावांचं लक्ष्य : हैदराबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 201 धावा केल्या. सुरुवातीला संघानं 35 धावात 2 विकेट गमावल्या होत्या. यानंतर ट्रॅव्हिस हेड आणि नितीश रेड्डी यांनी 57 चेंडूत 96 धावांची भागीदारी केली. नितीशनं 42 चेंडूत 76 धावांची नाबाद खेळी केली. तर हेडनं 44 चेंडूत 58 धावा केल्या. नितीशनं 30 चेंडूत अर्धशतक तर हेडनं 37 चेंडूत अर्धशतक केलं. अखेरीस हेनरिक क्लासेननं 19 चेंडूत 42 धावा केल्या. दुसरीकडं राजस्थान संघाकडून वेगवान गोलंदाज आवेश खाननं सर्वाधिक 2 बळी घेतले, तर संदीप शर्माला 1 विकेट मिळाली.
शेवटच्या षटकात भुवनेश्वरची कमाल : हैदराबाद संघानं दिलेलं 202 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या राजस्थान रॉयल संघाची सुरुवात खराब झाली. राजस्थान संघाला हैदराबाद संघानं सुरुवातीलाच दोन मोठे धक्के दिले. यात जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन हे भोपळाही न फोडता माघारी परतले. त्यांच्यानंतर मात्र यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांनी राजस्थानचा डाव सावरला. या दोघांनी केलेल्या 133 धावांच्या खेळीनं राजस्थान रॉयल संघाला विजयाच्या जवळ आणलं. मात्र त्यांच्या आशेवर हैदराबादच्या गोलंदाजांनी पाणी फेरलं. शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल संघाला दोन चेंडूवर दोन धावांची गरज होती. मात्र भुवनेश्वर कुमारनं रोव्हमन पॉवेलला बाद करुन हैदराबादला विजय मिळवून दिला. रोव्हमन पॉव्हेल 27 धावा करुन बाद झाला.
हेड टू हेड रेकॉर्ड : राजस्थान आणि हैदराबादचे संघ जेव्हा-जेव्हा आमनेसामने आले आहेत, तेव्हा दोघांमधील सामना रोमांचक झालाय. दोन्ही संघांमध्ये बरोबरीची स्पर्धा झालीय. राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण 18 सामने खेळले गेले आहेत, यामध्ये राजस्थान संघांनं 9 तर हैदराबाद संघानं 10 सामने जिंकले आहेत.
- एकूण सामने: 19
- राजस्थान जिंकला : 9
- हैदराबाद जिंकला : 10
- राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रीयान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि संदीप शर्मा.
- सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
हेही वाचा :