नवी दिल्ली Sunil Chhetri : भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीनं आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलीय. कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देणार आहे. सुनील छेत्रीनं गुरुवारी (16 मे) 6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केलीय.
सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत केली घोषणा : 39 वर्षीय सुनील छेत्रीनं 2005 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. तर छेत्रीनं मार्चमध्ये गुवाहाटी इथं अफगाणिस्तानविरुद्ध भारतासाठी 150 वा सामना खेळला होता. त्या सामन्यात त्यानं एक गोलही केला होता. मात्र तो सामना भारतानं 1-2 नं गमावला होता. छेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
काय म्हणाला सुनील छेत्री : आपल्या व्हिडिओमध्ये छेत्री म्हणाला, "मी पहिल्या सामन्यातच पहिला गोल केला होता. जेव्हा मी राष्ट्रीय संघाची जर्सी घातली तेव्हा एक वेगळीच भावना होती. पदार्पणाचा दिवस तो कधीही विसरु शकत नाही. ती भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. गेल्या 19 वर्षांतील मला आठवत असलेल्या गोष्टी म्हणजे कर्तव्य, दबाव आणि प्रचंड आनंद यांचा समतोल. मी वैयक्तिकरित्या कधीही विचार केला नाही की, मी देशासाठी हा खेळ खेळतो, जेव्हाही मी राष्ट्रीय संघासोबत प्रशिक्षण घेतो तेव्हा मी त्याचा आनंद घेतो. कुवेतविरुद्धच्या सामन्यात दडपण असेल, पुढील फेरीत पात्र ठरण्यासाठी आम्हाला तीन गुणांची गरज आहे, आमच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आता भारतीय संघाची 'नऊ नंबर' जर्सी पुढच्या पिढीकडे सोपवण्याची संधी चालून आलीय."
सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर : स्ट्रायकर सुनील छेत्रीनं अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिलाय. छेत्रीनं आतापर्यंत भारतासाठी 150 सामने खेळले आहेत आणि त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत त्यानं आतापर्यंत 94 गोल केले आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या बाबतीत सुनील छेत्री चौथ्या स्थानावर आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे. रोनाल्डोनं आतापर्यंत 206 सामने खेळले असून त्यानं एकूण 128 गोल केले आहेत. यानंतर इराणचा माजी खेळाडू अली दाई आहे, ज्यानं 148 सामन्यांत 108 गोल केले आहेत. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीनं 106 गोल (180 सामने) केले असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. सक्रिय फुटबॉलपटूंमध्ये पाहिलं तर, फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे छेत्रीच्या पुढे आहेत. तसंच, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा सुनील छेत्री हा दुसरा आशियाई खेळाडू आहे. या बाबतीत इराणचा अली दाई पहिल्या क्रमांकावर आहे.
भारताला अनेक चषक दिले जिंकवून : सुनील छेत्रीनं 2011 AFC आशियाई चषक स्पर्धेत भाग घेतला होता आणि 2012 AFC चॅलेंज कप पात्रता स्पर्धेत प्रथमच त्याची राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली होती. सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली त्यानं 2008 मध्ये भारतासोबत AFC चॅलेंज कप जिंकला होता. त्यानं 2011, 2015, 2021 आणि 2023 मध्ये SAFF चॅम्पियनशिप विजेतेपद जिंकून दक्षिण आशियाई फुटबॉलमध्ये भारताला प्रबळ शक्ती म्हणून स्थापित करण्यात मदत केली. भारतानं 2007, 2009 आणि 2012 मध्ये छेत्रीसह तीन नेहरु चषक जिंकले. 2018 आणि 2023 मध्ये भारताच्या इंटरकॉन्टिनेंटल चषक जिंकण्याचा तो भाग होता.
अनेक पुरस्कारांनी सन्मान : भारतीय कर्णधाराच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं त्याला भारत सरकारकडून दोनदा सन्मानित करण्यात आलंय. 2011 मध्ये त्याला पहिल्यांदा अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर 2021 मध्ये त्याला देशातील सर्वात मोठा क्रीडा सन्मान खेलरत्न पुरस्कारही मिळाला होता. तसंच छेत्रीनं 2007, 2011, 2013, 2014, 2017, 2018-19 आणि 2021-22 या हंगामात एकूण सात वेळा प्रतिष्ठित ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) प्लेयर ऑफ द इयरचा किताब जिंकलाय. तसंच त्यानं 2009, 2018 आणि 2019 मध्ये FPI इंडियन प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार देखील जिंकलाय.
सुनील छेत्रीचे रेकॉर्ड : भारतीय फुटबॉलसंघाचा कर्णधार सुनील छेत्रीनं दोन दशकांच्या कारकिर्दीत 365 क्लब सामन्यांमध्ये 158 गोल केले आहेत. जून 2005 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध त्यानं भारतासाठी वरिष्ठ पदार्पण केलं आणि त्याच्या पहिल्याच सामन्यात त्यानं गोल केला होता. छेत्रीनं भारतासाठी 150 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 94 गोल केले आहेत, ज्यामुळं तो सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये तिसरा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनलाय. सक्रिय खेळाडूंमध्ये तो अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (180 सामन्यांत 106 गोल) आणि पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (205 सामन्यांत 128 गोल) यांसारख्या खेळाडूंच्या मागे आहे.
हेही वाचा :