हरारे IND vs ZIM T20I : टी 20 क्रिकेट विश्वचषकानंतर आता भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांतील टी 20 मालिकेतील पहिला सामना आज हरारे इथं झाला. या सामन्यात यजमान झिम्बाब्वेनं 13 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी 116 धावांचं लक्ष्य होतं. पण हे छोटं लक्ष्यही त्यांना गाठता आलं नाही. भारतीय संघ 19.5 षटकांत 102 धावांवरच मर्यादित राहिला. झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मधील भारतीय संघाचा हा केवळ तिसरा पराभव ठरला. तर 2024 या वर्षात भारतीय संघाचा पहिलाच पराभव ठरला.
The match went down till the very last over but it's Zimbabwe who win the 1st T20I.#TeamIndia will aim to bounce back in the 2nd T20I tomorrow.
— BCCI (@BCCI) July 6, 2024
Scorecard ▶️ https://t.co/r08h7yfNHO#ZIMvIND pic.twitter.com/FLlBZjYxCb
फलंदाजांचं अपयश : सामन्याच्या शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावा करायच्या होत्या आणि ते षटक तेंडाई चतारानं टाकलं. त्या षटकात विजय निश्चित करण्याची जबाबदारी वॉशिंग्टन सुंदरवर होती, पण तो केवळ दोन धावा करु शकला आणि पाचव्या चेंडूवर तो बाद झाला. भारतीय संघाच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या फलंदाजांची खराब कामगिरी, अव्वल फळीतील फलंदाजांपैकी फक्त कर्णधार शुभमन गिल काही काळ क्रीजवर राहू शकला. गिलनं 31 धावांची खेळी खेळली. गिलशिवाय अवेश खान (16) आणि वॉशिंग्टन सुंदर (27) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला. इतर फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले.
रवी बिश्नोईची घातक गोलंदाजी : तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 9 गड्यांच्या मोबदल्यात 115 धावा केल्या होत्या. झिम्बाब्वेसाठी क्लाईव्ह मदंडेनं 29 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्यानं 25 चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार मारले. याशिवाय डिओन मायर्सनं 23 धावांचं, ब्रायन बेनेटनं 22 धावांचे आणि वेस्ली मधवेरेनं 21 धावांचं योगदान दिलं. या चौघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताकडून फिरकीपटू रवी बिश्नोईनं सर्वाधिक चार बळी घेतले.
टी 20 सामन्यांमध्ये भारताची सर्वांत कमी धावसंख्या :
- 74 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न 2008
- 79 विरुद्ध न्यूझीलंड, नागपूर 2016
- 92 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कटक 2016
- 101 विरुद्ध श्रीलंका, पुणे 2016
- 102 विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे 2024
टी 20 मध्ये झिम्बाब्वेचा सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वीपणे बचाव :
- 105 विरुद्ध वेस्ट इंडीज पोर्ट ऑफ स्पेन 2010
- 115 विरुद्ध भारत हरारे 2024*
- 117 विरुद्ध आयर्लंड डब्लिन 2021
- 118 विरुद्ध पाक हरारे 2021
- 124 विरुद्ध आयर्लंड ब्रॅडी 2021
टी 20 मध्ये भारताविरुद्ध सर्वात कमी लक्ष्यांचा यशस्वीपणे बचाव :
- 116 झिम्बाब्वे हरारे 2024*
- 127 न्यूझीलंड नागपूर 2016
- 131 दक्षिण आफ्रिका नॉटिंगहॅम 2009
- 146 झिम्बाब्वे हरारे 2016
- 150 वेस्ट इंडिज तरोबा 2023
टी 20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक सलग विजय (सुपर ओव्हरच्या विजयांसह) :
- 13 मलेशिया (2022)
- 13 बर्मुडा (2021-23)
- 12 अफगाणिस्तान (2018-19)
- 12 रोमानिया (2020-21)
- 12 भारत (2021-22)
- 12 भारत (2023-24)
तीन खेळाडूंचं पदार्पण : या सामन्याद्वारे अभिषेक शर्मा, ध्रुव जुरेल आणि रीयन पराग यांनी टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केलं. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून चमकदार कामगिरी करणारा अभिषेक शर्मा आणि राजस्थान रॉयल्स (RR) कडून खेळणारा रीयन पराग यांची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. या मालिकेसाठी हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
भारतीय संघाचा झिम्बाब्वे दौरा :
- 6 जुलै - पहिला टी 20, हरारे
- 7 जुलै - दुसरा टी 20, हरारे
- 10 जुलै - तीसरा टी 20, हरारे
- 13 जुलै - चौथा टी 20, हरारे
- 14 जुलै - पाचवा टी 20, हरारे
हेही वाचा :
- 'हिटमॅन' रोहित शर्मा...! भारतीय संघाला विश्वविजेता बनवताच कर्णधार रोहितनं केले अनेक विक्रम - Rohit Sharma Records
- 'विश्वविजेती' टीम इंडिया मायदेशी दाखल; आज मुंबईत निघणार भव्य विजयी मिरवणूक, 'हे' रस्ते असणार बंद! - Team India Victory Rally
- 'भारत माता की जय'च्या घोषणा देत क्रिकेटप्रेमींकडून जल्लोष, पाहा व्हिडिओ - T20 World Cup 2024