धर्मशाळा IND vs ENG 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघातील पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 7 मार्च ते 11 मार्च या कालावधीत धर्मशाळा येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यासाठी भारतीय संघाच्या खेळाडूंनी धर्मशाळा स्टेडियममध्ये भरपूर सरावही केला. भारतीय संघानं या मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतलीय. गेल्या सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडचा 5 विकेट्सनं पराभव केला होता. धर्मशाळेच्या मैदानावर भारताचा विक्रम चांगला राहिला आहे. भारतीय संघानं आतापर्यंत इथं एकच कसोटी सामना खेळून जिंकल.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात धर्मशाळेत पहिलाच कसोटी सामना : धर्मशाळा इथल्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात प्रथमच कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारतानं आतापर्यंत धर्मशाळेत एकच कसोटी सामना खेळला आहे. हा सामना मार्च 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. भारतीय संघानं हा सामना 8 विकेटनं जिंकला होता. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 300 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात त्यांचा संघ 137 धावा करुन सर्वबाद झाला होता. प्रत्युत्तरात भारतानं पहिल्या डावात 332 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात 106 धावा करत भारतानं सामना जिंकला.
112 वर्षे जुने रेकॉर्ड काय आहे : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं 5 सामन्यांच्या या मालिकेत आधीच 3-1 अशी अजेय आघाडी घेतलीय. आता भारतीय संघानं मालिकेतील शेवटचा सामना जिंकला तर 112 वर्षांनंतर कसोटी इतिहासात ऐतिहासिक विक्रम होईल. 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पुढील 4 सामने जिंकण्याचा हा क्रिकेट विक्रम आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी असं 3 वेळा घडलंय. आतापर्यंत हा विक्रम ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियानं हा विक्रम दोनदा तर इंग्लंडनं एकदा केलाय. सर्वप्रथम 1897 आणि 1901 मध्ये पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियानं पुढील सर्व सामने जिंकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा हा विक्रम मोडून इंग्लंडनं 112 वर्षांपूर्वी तो आपल्या नावावर केला होता. 1912 मध्ये 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पुढचे 4 सामने जिंकले होते. आता हा सामना जिकून भारतीय संघालाही 112 वर्षांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
धर्मशाळेच्या खेळपट्टीवर चालणार सिराजची जादू? : मंगळवारी भारतीय संघाच्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी क्रिकेट स्टेडियमबाहेर मोठी गर्दी केली होती. मात्र खेळाडूंसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्यानं भारतीय खेळाडूंना कडेकोट बंदोबस्तात स्टेडियममध्ये नेण्यात आलं. त्यामुळं स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या क्रिकेट चाहत्यांची निराशा झाली. सराव सत्रादरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करताना दिसला. धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी वेगवान आहे. वेगवान गोलंदाजांना अनेकदा या खेळपट्टीची मदत मिळते. अशा स्थितीत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला कसोटी सामन्यादरम्यान किती मदत मिळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
हेही वाचा :