मुंबई ICC Champions Trophy : पाकिस्तानमध्ये फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जाणार आहे. मात्र सध्या याची जोरदार चर्चा सुरु आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या स्पर्धत 8 संघ सहभागी होणार आहेत. सध्या यात सर्वात मोठा अडथळा आहे तो, भारतीय संघाच्या सहभागाचा कारण भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता कमी आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेटमध्ये सतत गदारोळ सुरु असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांच्याकडे संघ पाठवण्याचं आवाहन करण्यात येत आहे. हे घडेल की नाही हे येत्या काळातच स्पष्ट होईल, पण सध्या जय शाहांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी पाकिस्तानला तब्बल 70 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 586 कोटी रुपयांचं बजेट पास केलं आहे. मात्र, यानंतरही संपूर्ण स्पर्धा केवळ पाकिस्तानमध्येच आयोजित केली जाणार असल्याचं स्पष्ट झालेलं नाही.
जय शहांच्या निर्णयानंतर अर्थसंकल्प मंजूर : कोलंबोमध्ये नुकतीच आयसीसी बोर्डाची बैठक झाली. ज्यात बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यासह सर्व सदस्य क्रिकेट बोर्डाचे अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीत पीसीबीनं चॅम्पियन्स ट्रॉफीचा अर्थसंकल्प सादर केला, ज्याला मंजुरी मिळणार होती. हा अर्थसंकल्प मंजूर झाला असून त्यावर बीसीसीआयचे प्रमुख जय शाह यांनी स्वाक्षरी केली आहे. कारण जय शाह हे आयसीसीच्या अत्यंत शक्तिशाली वित्त आणि व्यावसायिक समितीचे अध्यक्ष आहेत, जे कोणत्याही स्पर्धेच्या बजेटला अंतिम मंजुरी देतात.
हायब्रीड मॉडेलमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होण्याची शक्यता : पीसीबी आणि आयसीसीच्या वित्त विभागानं स्पर्धेसाठी हे बजेट तयार केलं होतं. जे जय शाह यांच्या समितीनं तपासलं आणि नंतर मंजूर केल्याचं अहवालात म्हटलं आहे. यामुळं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आशा निर्माण झाली असेल की आता ही स्पर्धा त्यांच्या देशातच आयोजित केली जाईल, पण तसं नाही. हायब्रीड मॉडेलमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. म्हणूनच जय शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने स्पर्धेसाठी 4.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 37.67 कोटी रुपयांचं अतिरिक्त बजेटही ठेवलं आहे. याचा उपयोग इतर देशांमध्ये भारताचे सामने आयोजित करण्यासाठी होऊ शकतो.
कधी होणार चॅम्पियन्स ट्रॉफी : तब्बल 29 वर्षांनंतर पाकिस्तानात आयसीसी स्पर्धा परतत आहे. यापूर्वी, भारत आणि श्रीलंकेसह 1996 च्या विश्वचषकाचं पाकिस्तानात आयोजन केलं होतं. अशा स्थितीत ही स्पर्धा पूर्णपणे आपल्याच देशात आयोजित करण्यासाठी पाकिस्तान उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वी पीसीबीनं या स्पर्धेचं संभाव्य वेळापत्रकही जाहीर केलं होतं, ज्यात भारताचे सर्व सामने लाहोरमध्येच असल्याचं सांगण्यात आलं. ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत होणार आहे.
हेही वाचा :