विशाखापट्टणम IPL 2024 DC vs KKR : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सनं (KKR) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या हंगामात तिसरा विजय मिळवलाय. विशाखापट्टणम इथं बुधवारी झालेल्या सामन्यात केकेआरनं दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) 106 धावांनी दारुण पराभव केला. या सामन्यात केकेआर संघानं प्रथम फलंदाजी करताना ऐतिहासिक धावसंख्या उभारली. यानंतर दिल्लीचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक साधली. अशा प्रकारे केकेआर गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचलाय. तर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाचा चार सामन्यातील हा तिसरा पराभव आहे.
डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची दाणादाण : या सामन्यात कोलकातानं दिल्लीला आयपीएलच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक 272 धावांचं लक्ष्य दिलं होतं. प्रत्युत्तरात दिल्लीचा संघ 17.2 षटकांत 166 धावाच करू शकला. कर्णधार ऋषभ पंतनं संघासाठी 25 चेंडूत 55 धावांची तुफानी खेळी केली. पंत आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यात पाचव्या विकेटसाठी 47 चेंडूत 93 धावांची भागीदारी झाली. पण दोघांनाही संघाला विजयापर्यंत नेता आलं नाही. या डावात स्टब्सनं 28 चेंडूत अर्धशतक केलं. या सामन्यात त्यानं 32 चेंडूत 54 धावा केल्या. दुसरीकडं, कोलकाता संघाकडून स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि वेगवान गोलंदाज वैभव अरोरा यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. तर वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनं 2 बळी घेतले. सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांना 1-1 बळी मिळाला.
आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या : कोलकाता संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 7 गडी गमावून 272 धावांचा डोंगर उभारला. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या यादीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे. त्यांनी याच हंगामात 27 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 गडी गमावून 277 धावा केल्या होत्या. तसंच, आयपीएलच्या इतिहासातील केकेआरची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी त्यांनी पंजाब किंग्जविरुद्ध 5 विकेट्सवर 245 धावा केल्या होत्या. हा सामना 12 मे 2018 रोजी इंदूरमध्ये झाला. केकेआरनं हा सामना 31 धावांनी जिंकला होता.
नरेनचं वादळ : या सामन्यात सुनील नरेननं कोलकाताकडून 39 चेंडूत 85 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. यानंतर रघुवंशीनं 27 चेंडूत 54 धावा करुन आपली निवड सार्थ ठरवली. त्याचं हे पहिलंच आयपीएल अर्धशतक होतं. शेवटी आंद्रे रसेलनं 19 चेंडूत 41 धावांची तर रिंकू सिंगनं अवघ्या 8 चेंडूत 26 धावांची तुफानी खेळी केली.
कोलकाताची विजयी हॅट्ट्रिक : कोलकाता संघानं हा सामना जिंकून विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत आणि त्यातील सर्व जिंकले आहेत. केकेआरनं प्रथम सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 4 धावांनी पराभव केला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (आरसीबी) 7 गडी राखून पराभव केला. यानंतर आता दिल्लीला हरवलंय. दुसरीकडं या हंगामात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाचा हा चौथा सामना होता. आतापर्यंत, त्यांनी 4 पैकी फक्त 1 सामना जिंकलाय. ज्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा पराभव झालाय. तर राजस्थान रॉयल्स (RR), पंजाब किंग्ज (PBKS) आणि आता कोलकाताविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा (आतरराष्ट्रीय आणि डोमॅस्टिक) :
- 314/3 धावा - नेपाळ विरुद्ध मोगोंलिया, हँगझोउ, 2023
- 278/3 धावा - अफगाणिस्तान विरुद्ध आर्यलॅंड, डेहराडून, 2019
- 278/4 धावा - झेक रिपब्लिक विरुद्ध तुर्की, आयल्फोव काऊंटी, 2019
- 277/3 धावा - सनरायर्झस हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, मुंबई, 2024
- 272/7 धावा - कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स, विशाखापट्टणम, 2024*
हेही वाचा :