चेन्नई CSK vs PBKS IPL 2024 : आयपीएल 2024 च्या स्पर्धेतील 49 वा सामना बुधवारी चेन्नई सुपर किंग आणि किंग्ज एलेवन संघात चेपॉकवर खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नई संघानं प्रथम फलंदाजी करत पंजाब संघाला 163 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पंजाब संघानं हे लक्ष्य तीन बळी गमावत पूर्ण करत चेन्नई संघाला विजयाचा जोरदार 'पंच' दिला. त्यामुळे चेन्नई संघाची डोकेदुखी वाढली आहे. चेन्नईकडून जोरदार फलंदाजी करणाऱ्या कर्णधार ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक व्यर्थ गेलं.
पंजाब संघाला 163 धावांचं लक्ष्य : चेपॉकवर बुधवारी खेळवण्यात आलेल्या चेन्नई विरुद्ध पंजाब या सामन्यात चेन्नई संघानं प्रथम फलंदाजी केली. मात्र चेन्नईच्या फलंदाजांना फारसी समाधानकारक कामगिरी बजावता आली नाही. चेन्नईचे सलामीचे फलंदाज अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदार झाली. सलामीचे फलंदाज डाव सावरतील असं वाटत असतानाच हरप्रित ब्रारनं अजिंक्यला 29 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्याच षटकात फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेला ब्रारनं भोपळाही फोडून न देता तंबूत परत पाठवलं. शिवम दुबे स्वस्तात बाद झाल्यानंतर जडेजालाही फार काही करत आलं नाही. त्याला राहुल चहरनं बाद करुन चेन्नईच्या संघाला सुरुंग लावला. केवळ सहा धावात चेन्नईचे 3 फलंदाज माघारी परतले. एकीकडे चेन्नईचे फलंदाज फक्त हजेरी लावत असताना कर्णधार ऋतुराज गायकवाडनं एकतर्फी किल्ला लढवला. त्यानं 48 चेंडूत 62 धावा ठोकल्या. यात त्यानं 5 चौकार आणि 2 षटकार मारले.
महेंद्रसिंग धोनी हंगामात पहिल्यांदाच झाला धावबाद : चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या जोरदार फलंदाजीच्या बळावर चेन्नई संघानं दीडशे धावा केल्या. त्याला समीर रिझवी आणि मोईन अलीनं चांगली साथ दिली. शेवटच्या टप्प्यात महेंद्रसिंग धोनीनं काही फटके खेळले. मात्र शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेताना तो धावबाद झाला. महेंद्रसिंग धोनी हा या हंगामात पहिल्यांदाच धावबाद झाला. त्यानं 11 चेंडूत 14 धावांचं योगदान दिलं. चेन्नई संघानं 7 बाद 162 धावा करुन पंजाब संघाला 163 धावांचं विजय लक्ष्य दिलं. पंजाब संघाकडून हरप्रित ब्रार आणि राहुल चहरनं प्रत्येकी दोन बळी मिळवले.
पंजाबचा चेन्नईला विजय पंच : चेन्नई सुपर किंग संघानं पंजाब संघाला 163 धावांचं विजय लक्ष्य दिलं. प्रत्युत्तरात पंजाब संघानं 17.5 षटकातचं 3 गड्याच्या मोबदल्यात हे विजयी लक्ष्य पूर्ण केलं. पंजाब संघाकडून खेळताना जॉनी बेअरस्टोनं 30 चेंडूत 46 धावा केल्या. रिली रॉसोनं 23 चेंडूत 43 धावा कुटल्या तर शशांक सिंग 25 धावांवर आणि सॅम करण 26 धावांवर नाबाद राहिला. पंजाबचा या मोसमातील हा चौथा विजय आहे, तर चेन्नई संघाविरुद्धचा हा सलग पाचवा विजय आहे. चेन्नई संघाकडून शार्दुल ठाकुर, शिवम दुबे आणि रिचर्ड ग्लीसन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग 11 : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, समीर रिझवी, मोईनली, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, धोनी (यष्टीरक्षक), मुस्तफिझूर रहमान, दीपक चहर, मथिश पाथीराना आणि तुषार देहपांडे.
पंजाब किंग्जचा संभाव्य प्लेइंग 11 : सॅम कुरन (कर्णधार), प्रभासिमरन सिंग, रिले रौसो, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि अर्शदीप सिंग.
हेही वाचा :
- मुंबईचं पराभवाचं 'सप्तक'; लखनऊकडून पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा - LSG vs MI
- T20 World Cup 2024 Squads : T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी - India T20 World Cup 2024 Squad
- KKR Vs DC IPL2024 : 'सॉल्ट'नं मारला सामन्यात 'तडका'; कोलकातानं 'राजधानी एक्सप्रेस' रोखली, 7 विकेट्सनं मिळवला विजय - KKR vs DC IPL 2024 47th match