हैदराबाद Cricket News : क्रिकेट जगताशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. डोपिंगविरोधी उल्लंघनामुळं एका स्टार क्रिकेटरवर बंदी घालण्यात आली आहे. निरोशन डिकवेला असं या खेळाडूचं नाव आहे. लंका प्रीमियर लीग 2024 (LPL) दरम्यान कथित डोपिंग विरोधी उल्लंघनामुळं निरोशन डिकवेलाला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास सुरु असताना यष्टिरक्षक-फलंदाजवर अनिश्चित काळासाठी बंदी घातली जाऊ शकते. त्याच्या शिक्षेच्या मर्यादेबाबत लवकरच औपचारिक घोषणा अपेक्षित आहे.
Niroshan Dickwella has been suspended by the SLC due to anti-doping violation in LPL. pic.twitter.com/3da8QfLLCC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 16, 2024
निरोशन डिकवेलावर बंदी : वृत्तानुसार, देशांतर्गत टी-20 लीगदरम्यान निरोशन डिकवेला डोपिंगविरोधी चाचणीत अपयशी ठरला होता. डिकवेला या स्पर्धेत गॉल मार्व्हल्सचा कर्णधार होता. त्यानं या लीगच्या 10 डावांमध्ये 153.33 च्या स्ट्राइक रेटनं केवळ 184 धावा केल्या. त्यांचा संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पोहोचला होता, पण जाफना किंग्जकडून त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. डिकवेलानं अंतिम फेरीत आठ चेंडूंत केवळ पाच धावा केल्या. ही पहिलीच वेळ नाही, तर याआधीही निरोशन डिकवेला वादात सापडला आहे. 2021 मध्ये, इंग्लंडमध्ये बायो-बबल उल्लंघनामुळं दानुष्का गुनाथिलका आणि कुसल मेंडिससह त्याच्यावर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यानंतर तो बराच काळ संघाबाहेर होता. 2023 च्या सुरुवातीला त्यानं शेवटची कसोटी खेळली आणि 2022 मध्ये त्यानं शेवटचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कामगिरी कशी : निरोशन डिकवेलानं श्रीलंकेसाठी आतापर्यंत 54 कसोटी, 55 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्यानं 30.97 च्या सरासरीनं 2757 धावा केल्या आहेत. ज्यात 22 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, एकदिवसीय सामन्यात त्यानं 31.45 च्या सरासरीने 1604 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर टी-20मध्ये 480 धावा आहेत. श्रीलंका क्रिकेटसाठी गेले काही दिवस काही खास राहिलेले नाहीत. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) श्रीलंकेचा खेळाडू प्रवीण जयविक्रमावर आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेचं उल्लंघन केल्याचे आरोप लावले होते. जयविक्रमा याच्याकडे आरोपांना उत्तर देण्यासाठी 6 ऑगस्ट 2024 पासून 14 दिवसांचा अवधी आहे.
हेही वाचा :