पाटणा (बिहार) Ishan Kishan Father Joins Politics : भारतीय क्रिकेट संघ तसंच मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू इशान किशनच्या वडिलांची राजकीय इनिंग आजपासून सुरु होणार आहे. त्याचे वडील प्रणव कुमार पांडे हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षातून राजकीय इनिंगला सुरुवात करणार आहेत. ते आज पाटण्यात जेडीयूचं सदस्यत्व घेणार आहेत.
ईशान किशनचे वडील जेडीयूमध्ये होणार सामील : वास्तविक पाटण्यातील वीरचंद पटेल पथ इथं स्थित जनता दल युनायटेडच्या राज्य कार्यालयात आज एक बैठक समारंभ आयोजित करण्यात आला आहे. इशान किशनचे वडील अभियंता प्रणव कुमार पांडे उर्फ चुन्नूजी यादरम्यान जेडीयूचं सदस्यत्व घेतील. राष्ट्रीय कार्याध्यक्ष संजय झा आणि प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह त्यांना सदस्यत्व देणार आहेत. यादरम्यान खुद्द मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
ईशानचे वडील काय करतात? : ईशान किशनचे वडील प्रणव कुमार पांडे हे व्यवसायानं बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना समाजसेवेचीही खूप आवड होती. त्यांचं बालपण नवादा इथं गेलं. परंतु, बराच काळ ते संपूर्ण कुटुंबासह पाटण्यात राहत आहेत. पाटण्यात त्यांचं मेडिकल स्टोअरही आहे. इशानचे आजोबा रामुग्रह सिंह हे गोर्डिहा, नवादा इथं शेती करतात, तर आजी सावित्री देवी प्रसिद्ध महिला डॉक्टर आहेत.
ईशान किशन बिहारचा रहिवासी : भारतीय संघाचा 26 वर्षीय युवा खेळाडू ईशान किशननं भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो यष्टिरक्षक-फलंदाज आहे. त्यानं 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो स्थानिक क्रिकेटमध्ये तो झारखंड संघाकडून खेळायचा. मात्र तो मूळचा बिहारच्या नवादा जिल्ह्यातील आहे.
डिसेंबर 2023 पासून इशान किशन संघाबाहेर : इशाननं वैयक्तिक कारण सांगून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेतून आपलं नाव मागं घेतलं होतं. त्यानंतर त्याची कोणत्याही भारतीय संघात निवड झाली नाही. गेल्या महिन्यात, बुची बाबू स्पर्धेत झारखंडचा कर्णधार म्हणून किशननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. परंतु त्याचा संघ लीग टप्प्याच्या पुढं प्रगती करु शकला नसल्यामुळं त्याचा सहभाग दोन सामन्यांपुरता मर्यादित होता.
इशानची कारकिर्द कशी : इशान किशननं आतापर्यंत IPL च्या 105 सामन्यांमध्ये 28.43 च्या सरासरीनं आणि 135.87 च्या स्ट्राईक रेटनं 2644 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 56 बळीही आहेत. इशानच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं 2 कसोटीत 78 धावा, 27 एकदिवसीय सामन्यांत 933 धावा आणि 32 आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांत 796 धावा केल्या आहेत.
हेही वाचा :