T20 World Cup 2024 : अफगाणिस्ताननंं टी-20 विश्वचषक 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला आहे. 7 वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला आहे. सुपर 8 सामन्यात अफगाणिस्ताननं 21 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं 149 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. धावांचा पाठलाग करता ऑस्ट्रेलियन संघ 127 धावांवर सर्वबाद झाला. अफगाणिस्तानकडून गुलाबदिन नायबनं 4 बळी घेतले. तर नवीन-उल-हकनं 3 बळी घेतले. ऑस्ट्रेलियन संघानं 6 वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि यापूर्वी टी-20 विश्वचषक जिंकला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघानं 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या आहेत. यादरम्यान सलामीवीर गुरबाजनं 49 चेंडूंचा सामना करत 60 धावा केल्या. त्यानं 4 चौकार आणि 4 षटकार मारले. इब्राहिम झद्राननं 51 धावांची खेळी केली. त्यानं 48 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार मारले. यादरम्यान ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं 3 विकेट घेतले. ॲडम झाम्पानं 2 विकेट घेतले.
ऑस्ट्रेलियाची फलंदाजी : 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची या सामन्यात खूपच खराब सुरुवात झाली ज्यात पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेड खातं न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर कांगारू संघाचा कर्णधार मिचेल मार्श फलंदाजीत काही विशेष कामगिरी करू शकला नाही तो 12 धावा करून नवीन उल हकचा बळी ठरला. सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरच्या रूपानं ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का बसला. पॉवर प्लेअखेर कांगारू संघाची धावसंख्या 33 धावा होती. ग्लेन मॅक्सवेलनं एका टोकाकडून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याला मार्कस स्टॉइनिसची साथ लाभली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये 39 धावांची भागीदारी झाली. 17 चेंडूत 11 धावांची खेळी केल्यानंतर स्टॉइनिस गुलबदिन नायबचा बळी ठरला. ही भागीदारी तुटल्यानं अफगाणिस्तान संघाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. ग्लेन मॅक्सवेलनंही 41 चेंडूत 59 धावा केल्यानंतर महत्त्वाच्या वेळी आपली विकेट दिली. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला 15 धावांचा आकडाही पार करता आला नाही. या सामन्यातत ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही.
- अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी : अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज गुलाबदिन नायबनं 4 षटकात फक्त 20 धावा देत 4 विकेट घेतले. नवीन-उल-हकनं 4 षटकांत 20 धावा देत 3 विकेट घेतले. ओमरझाई आणि रशीद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.
- ऑस्ट्रेलिया विश्वचषकातून बाहेर पडणार? : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ गट-1 मध्ये आहेत. या गटात अफगाणिस्तान आणि बांगलादेशचाही समावेश आहे. गटातील चारही संघांनी प्रत्येकी 2 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये फक्त भारतानं 2 विजय नोंदवले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने 1-1 असा विजय मिळवला आहे. तर बांगलादेशला एकही सामना जिंकता आला नाही. भारतानं जवळपास उपांत्य फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाला शेवटचा सामना भारताविरुद्ध तर अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. जर ऑस्ट्रेलियानं शेवटचा सामना जिंकला आणि अफगाणिस्ताननं शेवटचा सामना गमावला तर ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित करेल.जर ऑस्ट्रेलियानं शेवटचा सामना गमावला आणि अफगाणिस्ताननं शेवटचा सामना जिंकला तर अफगाणिस्तान संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. आता सर्वांच्या नजरा दोन्ही संघांच्या शेवटच्या सामन्याकडे असतील.
अफगाणिस्तान उपांत्य फेरीत पोहोचणार का? : बांगलादेशप्रमाणंच अफगाणिस्तान संघ कधी कोणत्या संघाला पराभूत करेल, याचा भरवसा नसतो. अफगाणिस्ताननं इंग्लंडला 2023 मध्ये, पाकिस्तानला 2023 मध्ये, श्रीलंकेला 2023 मध्ये पराभतू केलं होतं. तर यंदाच्या टी-20 मध्ये अफगाणिस्ताननं न्यूझीलंडसह ऑस्ट्रेलियाला पराभूत करून क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का दिला. अफगाणिस्ताचा संघाची चांगली कामगिरी होताना हा संघ उपांत्यफेरीत धडक मारणार का? हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा
- आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस' का साजरा केला जातो! जाणून घ्या इतिहास आणि महत्व - International Olympic Day 2024
- भारतानं 50 धावांनी विजय मिळवित बांगलादेशचा उडवला धुव्वा, 'हे' खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार - T20 World Cup 2024
- जसप्रीत बुमराह प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी ठरतोय 'कर्दनकाळ'; टी 20 विश्वचषकातील आकडेवारी एकदा पाहाच... - T20 World Cup 2024