मुंबई Player of the Match Award : क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे, ज्यात प्रत्येकजण भाग घेतो हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु अनेक वेळा असं घडतं की एका खेळाडूच्या उत्कृष्ट कामगिरीमुळं संपूर्ण सामन्याचा निकाल बदलतो. यामुळंच क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार दिला जातो.
इतिहासात तीन वेगळे प्रसंग : सामान्यत: सामनावीर पुरस्कार विजेत्या संघाच्या खेळाडूला दिला जातो, परंतु काहीवेळा पराभूत संघाच्या खेळाडूला कामगिरीच्या आधारे सामनावीर पुरस्कारही दिला जातो. मात्र क्रिकेटच्या इतिहासात असे तीन प्रसंग घडले आहेत, जेव्हा संपूर्ण संघाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनदा आणि कसोटी क्रिकेटमध्ये एकदा असं घडलं आहे. संपूर्ण संघाला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं.
3 एप्रिल 1996 (न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज, चौथा एकदिवसीय सामना)
एप्रिल 1996 मध्ये जॉर्जटाउन इथं खेळल्या गेलेल्या रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडनं वेस्ट इंडिजचा 4 धावांनी पराभव केला. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच संपूर्ण संघाला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
वास्तविक, 5 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडचा संघ 2-1 नं पिछाडीवर होता आणि चौथ्या सामन्यातही प्रथम फलंदाजी करताना केवळ 158 धावांत सर्वबाद झाला होता. त्यावेळी वेस्ट इंडिजची भक्कम फलंदाजी सहज सामना जिंकेल असं सर्वांना वाटत होतं, परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी दमदार कामगिरी करून 104/4 अशी स्थिती असतानाही वेस्ट इंडिजचा डाव 154 धावांत गुंडाळला आणि सामना 4 धावांनी जिंकला. जिंकले. कमी धावसंख्येच्या सामन्यात, 4 फलंदाजांनी धावा केल्या होत्या, तर सर्व 6 गोलंदाजांनी विकेट घेतल्या आणि संपूर्ण संघानं प्रयत्न केले. परिणामी संपूर्ण संघाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
1 सप्टेंबर 1996 (पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड, तिसरा एकदिवसीय सामना)
इंग्लंड आणि पाकिस्तानचे संघ तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळत होते. जिथं पाकिस्तान संघ सन्मान वाचवण्यासाठी खेळत होता कारण आधीचे दोन्ही सामने गमावून मालिका गमावली होती. या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निक नाइटच्या 125 धावांच्या बळावर पाकिस्तानला 50 षटकांत 247 धावांचं लक्ष्य दिलं. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघासाठी सईद आणि शाहिद अन्वर यांनी 93 धावांची सलामी दिली.
पहिला आणि शेवटचा सामना खेळणारा शाहिद अन्वर 37 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर जोरदार सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानचा संघ 177/2 वरून 199/6 पर्यंत पोहोचला. एकेकाळी पाकिस्तान हा सामना हरणार असं वाटत होतं, पण शेवटी यष्टीरक्षक रशीद लतीफनं 28 चेंडूत 31 धावांची खेळी करत पाकिस्तानला दोन चेंडू शिल्लक असताना 2 विकेटनं विजय मिळवून देण्यात यश मिळवले. या सामन्यात जिथं पाकिस्तानच्या प्रत्येक फलंदाजानं धावा केल्या, तिथं सर्व गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी करत विकेट्स घेतल्या आणि संपूर्ण संघानं मिळून हरलेला सामना जिंकला. उत्कृष्ट सांघिक कामगिरीसाठी संपूर्ण पाकिस्तान संघाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
15-18 जानेवारी, 1999 (वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पाचवी कसोटी)
क्रिकेट इतिहासातील ही एकमेव कसोटी होती, ज्यात संपूर्ण संघाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. आफ्रिकन संघ 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 नं आघाडीवर होता अखेरच्या सामन्यात व्हाईटवॉश करण्याच्या इराद्यानं उतरला होता. या सामन्यात वेस्ट इंडिजनं चांगली सुरुवात करत आफ्रिकेचा संघ 18/3 पर्यंत कमी केला पण मार्क बाउचरचं शतक आणि कॅलिसच्या खेळीच्या जोरावर आफ्रिकेनं पहिल्या डावात 313 धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजीमध्ये ॲलन डोनाल्डनं 5 आणि शॉन पोलॉक आणि क्लुसनरनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्यानं वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात 144 धावांवर आटोपला.
त्याचप्रमाणे दुसऱ्या डावात कर्स्टन आणि रोड्स यांनी आफ्रिकेसाठी शतकं झळकावली आणि दुसऱ्या डावात आफ्रिकेनं 399/5 धावा करुन डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजीत पॉल ॲडम्सनं 4, कॅलिसनं 2 आणि कलिनननं 1 बळी घेत आफ्रिकेकडून पाहुण्या संघाचा 351 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला आणि अशा प्रकारे संपूर्ण संघानं सामनावीराचा किताब पटकावला.
हेही वाचा :