मुंबई Most Wickets in Debut Test Match : सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत व्यस्त आहे. दुसरीकडं, पाकिस्तान संघही मायदेशात तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध यजमानपद भूषवत आहे. कसोटी क्रिकेटचं स्वतःचं महत्त्व आहे आणि त्यात सहभागी होणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असतं. त्यातच एखाद्या क्रिकेटपटूनं पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावलं किंवा गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली तर तो चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण करतो.
Happy Birthday Narendra Hirwani
— Cricketopia (@CricketopiaCom) October 18, 2024
The Best Bowling Figure on a Test Debut: 16 for 136 (8/61 & 8/75) in his debut test against West Indies at Chennai.
Hirwani played 17 tests and 18 ODIs for India and took 66 and 23 wickets respectively. pic.twitter.com/jhMEvVFm10
भारतीय खेळाडूनं पदार्पणाच्या सामन्यात केला विश्वविक्रम : भारतीय क्रिकेट संघाचा माजी लेग-स्पिनर नरेंद्र हिरवाणीचा कसोटी पदार्पण कोण विसरु शकेल, जो आज (18 ऑक्टोबर) आपला 56वा वाढदिवस साजरा करत आहे. हिरवाणीनं जानेवारी 1988 मध्ये चेन्नईमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करतानाच कहर केला. त्या सामन्यात हिरवाणीनं पहिल्या डावात 61 धावांत आठ गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात 75 धावांत आठ विकेट्स घेतल्या. म्हणजेच नरेंद्र हिरवाणीनं पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 136 धावांत 16 बळी घेतले. पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील ही कोणत्याही गोलंदाजाची सर्वोत्तम गोलंदाजी होती. त्याचा हा विक्रम आजही कायम आहे. जेव्हा हिरवाणीनं हा पराक्रम गाजवला तेव्हा त्याचं वय अवघे 19 वर्षे 85 दिवस होतं. हिरवाणीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघानं तो सामना 255 धावांनी जिंकला. त्या सामन्यात भारतीय संघाचे कर्णधार रवी शास्त्री होते.
कोणाच्या नावावर आणखी विक्रम : तसं पाहिलं तर, पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा बॉब मॅसी हिरवाणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मॅसीनं 1972 मध्ये लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध 137 धावांत 16 बळी घेतले होते. या यादीत इंग्लंडचा फ्रेडरिक मार्टिन तिसऱ्या क्रमांकावर आहे. 1890 मध्ये झालेल्या ओव्हल कसोटीत मार्टिननं कांगारु संघाविरुद्ध 102 धावांत 12 बळी घेतले होते.
हिरवाणीच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम : नरेंद्र हिरवानी यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक विश्वविक्रम आहे. 1990 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत हिरवाणीनं 59 षटके विना ब्रेक टाकली. यादरम्यान त्यानं 18 मेडन ओव्हर टाकली आणि 137 धावांत 1 बळी घेतला. कसोटी सामन्यात ब्रेक न घेता कोणत्याही गोलंदाजाचा हा सर्वात मोठा गोलंदाजी स्पेल होता. त्याचा हा विक्रम आजही अबाधित आहे.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द कशी : नरेंद्र हिरवाणीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 8 वर्षे (1988-96) टिकली. यात हिरवाणीनं भारतासाठी 17 कसोटी आणि 18 एकदिवसीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये हिरवाणीनं 30.10 च्या सरासरीनं 66 विकेट घेतल्या. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात हिरवानीच्या नावावर 31.26 च्या सरासरीनं 23 बळी आहेत.
हिरवाणीचा मुलगाही क्रिकेटपटू : नरेंद्र हिरवाणीनं आपल्या पहिल्या चार कसोटी सामन्यांमध्ये 36 विकेट घेतल्या. यानंतर, त्यानं पुढील नऊ कसोटी परदेशी भूमीवर खेळल्या, जिथं त्याला विकेट्स घेण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि 59 च्या सरासरीनं त्याला फक्त 21 विकेट घेता आल्या. या खराब कामगिरीनंतर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नाही. हिरवाणीचा मुलगा मिहीरही लेगस्पिनर आहे. 30 वर्षीय मिहिर हिरवाणानं आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 31 प्रथम श्रेणी, 23 लिस्ट-ए आणि 24 T20 सामने खेळले आहेत.
हेही वाचा :