शिर्डी (अहमदनगर) Shirdi Sai Baba Temple : शिर्डीला येणारे साईभक्त आपल्या परीने साई चरणी दान अर्पण करत असतात. साई बाबावर असलेली भक्ती आणि आईवर असलेल्या प्रेमापोटी मुंबईतील एका साईभक्ताने आपल्या सेवानिवृत्तीच्या मिळालेल्या पैशातून साईबाबा संस्थानला एक रुग्णवाहिका (Ambulance) देणगी स्वरूपात भेट दिलीय.
साईबाबा संस्थानला दिली रुग्णवाहिका देणगी : शिर्डीला येणाऱ्या असंख्य भाविकांपैकी जर कोणास रुग्णवाहिकेची आवश्यकता भासली तर त्या व्यक्तीला त्वरित रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी. यातून एखाद्याचे प्राण वाचावेत या उदात्त हेतूने, मुंबई येथील शशिकला शामराव कोकरे यांनी आपल्या आई चंद्रभागा कृष्णा तांदळे यांच्या स्मरणार्थ स्वतःच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैश्यांमधून अंदाजे 20 लाख रूपये किंमतीची टेंम्पो ट्रॅव्हलर रुग्णवाहिका साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिलीय.
रुग्णवाहिकाची विधीवत पूजा : शशिकला कोकरे यांची तब्येत ठीक नसल्यानं त्यांच्यावर मुंबई येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं, त्या शिर्डीला येवू शकल्या नाहीत. त्यांचे नातेवाईक रविंद्र सुरवसे, जीवन विश्वकर्मा आणि विजय तावडे यांच्या हस्ते ही रुग्णवाहिका साईबाबा संस्थानला देण्यात आलीय. साईबाबा मंदिराच्या चार नंबर प्रवेशद्वारा समोर या रुग्णवाहिकाची विधीवत पूजा करण्यात आली. या रुग्णवाहिकेची चावी साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी भिकन दाभाडे आणि प्रशासकीय अधिकारी राजतीलक बागवे यांना सुपुर्द करण्यात आली.
लवकरच साईबाबांच्या दर्शनासाठी येणार : रुग्णवाहिका साईबाबा संस्थानाला देणगी देणाऱ्या शशिकला कोकरे यांची तब्येत ठीक नाही. त्यांची तब्येत लवकर ठणठणीत व्हावी यासाठी, साईबाबा संस्थानच्या वतीनं साईबाबांच्या चरणी प्रार्थना करण्यात आलीय. शशिकला कोकरे यांची तब्येत ठीक झाल्यानंतर लवकरच त्या साईबाबांच्या दर्शनासाठी येणार असल्याचं, व्हिडिओ कॉलद्वारे साईबाबा संस्थानच्या अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितलंय.
हेही वाचा -