हैदराबाद : भारतात अनेक पद्धतीने दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रातील काही भागात दिवाळी (Diwali 2024) सुरु होते ती 'वसुबारस' (Vasubaras 2024) या दिवसापासून. गाई तसेच गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
वसुबारस पूजा विधी : कार्तिक कृष्ण पक्षातील द्वादशीला सकाळी गाय आणि वासराला स्नान घालतात. ही पूजा मुख्यतः संध्याकाळच्या वेळी केली जाते.पूजेपूर्वी त्यांना रंगीबेरंगी कपडे आणि फुलांचा हार घालण्यात येतो. त्यांच्या कपाळावर सिंदूर किंवा हळदीचा तिळा लावला जातो. काही ठिकाणी गाय, वासरू यांची मूर्ती ठेवली जाते. त्यांना गव्हाचे पदार्थ, हरभरा आणि मूग भोग म्हणून दिला जातो. यानंतर आरती केली जाते. भारतातील अनेक गावांमध्ये गाय हे मातृत्व आणि उपजीविकेचे मुख्य साधन असल्यानं या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या कल्याणासाठी उपास करतात.
काय आहे वसुबारसचं महत्त्व? : वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्व भविष्य पुराणात सांगितलं आहे. हा सण नंदिनी व्रत या नावानेही साजरा केला जातो. कारण शैव परंपरेत नंदिनी आणि नंदी (बैल) दोन्ही अतिशय पवित्र मानले जातात. हा सण मुळात गाईंबद्दल मानवी जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळं या दिवशी गाय आणि वासरू यांची एकत्र पूजा केली जाते. पूजेदरम्यान गव्हापासून तयार केलेले पदार्थ त्यांना खायला दिले जातात. असं मानलं जातं की, गोवत्स द्वादशीची पहिली पूजा राजा उत्तानपाद (स्वयंभू मनूचा मुलगा) आणि त्यांची पत्नी सुनीती यांनी उपवास करून साजरी केली होती. त्यांच्या प्रार्थना आणि उपवासामुळं त्यांना ध्रुव नावाचा मुलगा झाला. या दिवशी उपासक गहू आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करत नाहीत.
वसुबारस पूजेचा शुभ मुहूर्त : वसुबारस तिथीची सुरुवात ही सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजून ५३ मिनिटांपासून होणार असून, समाप्ती ही मंगळवार, २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ०४ मिनिटांनी होणार आहे.
टीप - सदरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. या लेखातील माहितीशी 'ईटीव्ही भारत' सहमत असेलच असं नाही.
हेही वाचा -