मुंबई CM Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या आंदोलनाची लढाई आता तीव्र झाली आहे. मराठा समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. तसेच मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून, वेळ पडली तर मराठा आरक्षणासाठी वेगळा कायदा करू पण मराठा आरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.
ओबीसींच्या सवलती देणार : मराठा आरक्षणासाठी राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटवलंय. जरांगे पाटील हे आंदोलन करण्यासाठी मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ओबीसींच्या सवलती देणार, अशी ग्वाही दिली. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार असल्यानं समाजानं आता आंदोलनावर ठाम न राहता सरकारला सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जरांगे-पाटील यांना केलंय.
सर्वेक्षणाची मोहीम राबवली जाईल : मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली ते मुंबई अशी रॅली काढली आहे. २६ जानेवारीला जरांगे-पाटील मुंबईत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर सरकारची भूमिका मांडली. मराठा समाजासाठी कुणबी नोदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारकडून तीन शिफ्टमध्ये दीड लाख लोक काम करत आहेत. आतापर्यंत लाखो कुणबी प्रमाणपत्र दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
न्यायालयात कायदा टिकला नाही : २३ डिसेंबरपासून मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे. संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. राज्यभरात सर्वेक्षणाची मोहीम राबवली जात आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा महाविकास आघाडीच्या काळात न्यायालयात टिकला नाही, असं सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली. आताच्या सरकारनं मराठा समाजाला दिलं जाणारं आरक्षण न्यायालयात टिकेल, अशा पद्धतीनं काम करत असल्याचं शिंदे म्हणाले.
अहंकारामुळं रावणाचे राज्य गेलं : पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'बाळासाहेबांच्या विचारांचं हे सरकार आहे. बाळासाहेबांना अभिप्रेत असणारं काम या सरकारकडून होत आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचं काम हे सरकार करत आहे. बाळासाहेबांचं राम मंदिराचं स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण केलं. त्यामुळं त्यांना मी धन्यवाद देतो. तसेच राम कोण होता आणि रावण कोण होता हे जनतेला माहिती आहे.'
उद्धव ठाकरेंना टोला : रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं हे देखील माहिती आहे. रावणाच्या अहंकारामुळं त्याचं राज्य गेलं. तसं राज्यकर्त्यांच्या अहंकारामुळं त्यांचं राज्य गेलं. जनतेचं हित ओळखून राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे. स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून काम केलं पाहिजे. 'जो राम का नही, ओ किसका नही' असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला, तसंच त्यांना प्रभू रामावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असंही शिंदे म्हणाले.
हेही वाचा -