मुंबई Lok Sabha Election 2024 : मुंबईत 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. शनिवारपर्यंत प्रचार करता येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) मुंबईत शुक्रवारी शिवाजी पार्क येथे सभा होणार आहे. त्यापूर्वी त्यांनी मुंबईत पहिल्यांदाच बुधवारी 'रोड शो' केला. या रोड शोला मोठी गर्दी होती. परंतु या रोड शोमुळं वाहतूक कोंडीमुळं मुंबईकरांचे हाल देखील झाले. तर दुसरीकडं शिवसेना (ठाकरे) यांच्यामुळं मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं असं बोललं जातय.
का मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं? : मुंबईत शिवसेना आणि मुख्यत: ठाकरे नावाला वलय आहे. मोठ्या प्रमाणात मराठी मतदार हा अनेक वर्षापासून शिवसेनेला मतदान करत आहे. मात्र, आता शिवसेनेत फूट पडल्यामुळं उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं चित्र आहे. दुसरीकडं पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंवर "नकली शिवसेना..., नकली संतान...," अशी टीका करत आहेत, त्याला उद्धव ठाकरेही आक्रमकपणे प्रतिउत्तर देत आहेत. थोडक्यात काय तर उद्धव ठाकरेंनी मोदींना नमवलं असल्याचं राजकीय जाणकार आणि तज्ञ म्हणत आहेत. मुंबईत भाजपाला आणि मोदींना पराभवाची भीती वाटत असल्यामुळं त्यांनी कधी नव्हे तो 'रोड शो' केला. अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांच्यामुळं मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं का? काय आहेत कारणे पाहूयात...
मुंबईत मोदींचा पहिलाच 'रोड शो' : 2014 ते 2024 या कालावधीत मोदींनी पहिल्यांदाच बुधवारी मुंबईत 'रोड शो' केला आहे. तसंच यापूर्वी त्यांना महाराष्ट्रात कधीही एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नव्हत्या, जेवढ्या त्यांनी यावेळी मुंबईसह महाराष्ट्रात घेतल्या आहेत. याला कारणे म्हणजे महायुतीच्या विरोधात वातावरण असल्याची माहिती सर्वेच्या माध्यमातून समोर आलीय. दुसरं म्हणजे राज्यात दोन पक्ष फोडाफोडीच्या घटना घडल्या. हे लोकांच्या पचनी पडलेलं नाही असं दिसतंय. कारण 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युती म्हणून एकत्र निवडणूक लढवली होती. तेव्हा मुंबईतून जी हक्काची आणि अपेक्षित मतं होती, ती मिळणार यात कुठेही भाजपाला शंका नव्हती. म्हणून मोदी किंवा भाजपातील वरिष्ठ नेत्यांना मुंबईत लक्ष घालण्याची आवश्यकता भासली नव्हती. पण आता शिवसेनेत दोन गट पडल्यामुळं वातावरण उलट आहे. उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्यामुळं आणि मतांचे गणित पाहता कधी नव्हे ते मोदींना मुंबईत पहिल्यांदाच 'रोड शो' करावा लागला आहे.
... म्हणून मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं : एकीकडं उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, पक्षाचे चिन्ह हे गेले आहे. अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी नगरसेवक हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले आहेत. जे लोक आहेत त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेकडून दबाव आणला जात आहे. "मोदी उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना... आणि त्या नकली शिवसेनेचा नकली संतान..." अशी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करत आहेत. त्याला तोडीस तोड उद्धव ठाकरेही मोदी आणि भाजपावर निशाणा साधत आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होत आहे. राज्यातील वातावरण हे महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं सर्वेतून म्हटलं जातंय. दुसरीकडं मुंबई म्हटलं की, शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण कित्येक वर्षापासून चालत आलंय. मराठी माणूस शिवसेनेलाच मतदान करत आलाय हा इतिहास आहे. ठाकरे आडनाव हे मतदारांवरती प्रभाव टाकू शकते. या सर्व कारणामुळं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सेनेचे जमेची बाजू ठरते. हे मोदी आणि भाजपाच्या नेत्यांच्या लक्षात आल्यामुळं मोदींना कधी नाही ते मुंबईत पहिल्यांदाच 'रोड शो' करावा लागला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राजकीय पडसाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवारी मुंबईत 'रोड शो' झाला. मोदींना पाहण्यासाठी मुंबईकरांची 'रोड शो'ला गर्दी झाली होती. पण सध्या या रोड शोवरुन राजकीय पडसाद उमटत आहेत. "मुंबईत 'रोड शो' करण्याचा निर्णय म्हणजे शहाणपणाचं लक्षण नसल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे". दुसरीकडं दहा वर्षांत पहिल्यांदाच मोदींना मुंबईच्या रस्त्यावर आणण्यात आम्ही यश मिळाल्याचा दावा शिवसेना (उबाठा) करत आहे. मोदी लवकरच गुडघे टेकतील अशी टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली आहे. आमच्यामुळं केवळ आमच्या भीतीमुळं आम्ही त्यांना पराभूत करू या भावनेनं शिवसेनेमुळं मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं. आम्ही त्यांना रस्त्यावर उतरवलं अशी टीका, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर करताना म्हटलंय.
आम्ही घरकोंबडे नाही : बुधवारी मोदींच्या 'रोड शो' ला मुंबईकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि विरोधकांच्या पोटात दुखू लागलं, अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केलीय. सकाळी नऊचा भोंगा म्हणू लागला की, आम्ही पंतप्रधानांना रस्त्यावर आणलं. लोकांची सुख, दुःख समजून घ्यायला रस्त्यावरतीच यावं लागतं. आमचं नेतृत्व हे जनतेच्या सुखदुःखाशी एकरूप होणारं नेतृत्व आहे. त्यामुळं ते नेहमी 24 तास जनतेमध्ये असतात. रस्त्यावर उतरुन लोकांचे प्रश्न सोडवतात. समस्या घेऊन येणाऱ्या लोकांच्यासाठी दार बंद करायची आणि खिडकीतून मजा बघायची हे वृत्ती तुमची आहे. घरी बसून काम करणं, घर कोंबडं नेतृत्व आमचं नाही. बुधवारी फक्त गर्दी ओसडूंन वाहत नव्हती तर हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद सुद्धा मोदींना मिळत होता. मुंबईकर जनतेचा विश्वास हा रोड शोच्या गर्दीतून दिसत होता, हा देश फक्त मोदीजींच्या हातामध्ये सुरक्षित आहे. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या हातात सुरक्षित आहे. असं शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी म्हटलंय.
ठाकरे आणि पवारच रस्त्यावर आले : शिवसेना (उबाठा) यांच्यामुळं मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं, अशी टीका विरोधकांनी केलीय, असा प्रश्न भाजपा नेते प्रसाद लाड यांना विचारला असता, रस्त्यावर कोण आलं हे मागील दीड-दोन वर्षाच्या कालावधीत जनतेनं पाहिलं आहे. निवडणूक आयोगानं निर्णय दिला आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच दोघे खऱ्या अर्थाने रस्त्यावर आले आहेत. असा प्रहार भाजपाचे प्रवक्ते आणि आमदार प्रसाद लाड यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलाय.
आमचा त्यांनी धसका घेतलाय : जेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो तेव्हा त्यांना आमच्याकडून मतदान होत होतं. त्यांचे उमेदवार विजयी होत होते. परंतु आता शिवसेना त्यांच्यासोबत नसल्यामुळं मतांचं समीकरण याचं गणित मोदींना आणि भाजपाला चांगलंच ठाऊक झालंय. त्यामुळंच त्यांना कधी नव्हे ते दहा वर्षात पहिल्यांदाच मुंबईच्या रस्त्यावर उतरून 'रोड शो' करावा लागला. आमच्यामुळं त्यांचा पराभव होईल ही भीती त्यांना सतावत आहे. आमचा त्यांनी धसका घेतला आहे, म्हणून त्यांना रस्त्यावर उतरून मतांसाठी भीक मागावी लागत आहे, अशी बोचरी टीका शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार विनायक राऊत यांनी मोदींवर केलीय.
हेही वाचा -
- राऊतांच्या 'त्या' आरोपानंतर हेलिकॉप्टमधून उतरताच निवडणूक विभागाकडून मुख्यमंत्र्यांच्या सामानाची तपासणी, मात्र... - lok sabha election
- मोदींच्या रोडशोमुळे मुंबईकर त्रस्त, मात्र मंत्री शंभूराज देसाई यांचं मौन - PM Modi Road Show
- मुंबईत धार्मिक कार्यक्रमात भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन भोवलं; आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल - lok sabha election 2024