पाटणा Samrat Choudhary : बिहारमध्ये नवं एनडीएचं सरकार स्थापन झालंय. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर त्यांच्यासोबत बिहार भाजपाचे अध्यक्ष सम्राट चौधरी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्हा उपमुख्यमंत्री बनले. सम्राट चौधरी यांना त्यांचे समर्थक 'बिहारचे योगी' म्हणतात. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी तर त्यांना भावी मुख्यमंत्री म्हटलं आहे.
सम्राट चौधरी यांची कारकीर्द : राष्ट्रीय जनता दलातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे 54 वर्षीय सम्राट चौधरी 1999 मध्ये पहिल्यांदा खगरियामधील परबट्टा येथून आमदार झाले. राबडी देवी सरकारमध्ये ते मंत्री होते. नंतर ते जीतनराम मांझी यांच्यासोबत गेले. मात्र कालांतरानं त्यांनी मांझींची साथ सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. 2020 च्या विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या NDA सरकारमध्ये सम्राट चौधरी मंत्री झाले. नितीश मंत्रिमंडळात त्यांना पंचायत राज खात्याची जबाबदारी मिळाली. त्यांच्या कार्यकाळात बिहारमध्ये पंचायत निवडणुका झाल्या.
कुर्मी आणि कुशवाह जातींवर पकड : सम्राट चौधरी हे कोरी जातीतून (कुशवाह) आले आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार यांचा लव-कुश म्हणजेच कुर्मी आणि कुशवाह जातींवर पकड असल्याचं मानलं जातं. भाजपानं 27 मार्च 2023 रोजी सम्राट चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष बनवून नितीश यांच्या व्होटबँकेला तडा देण्याचा प्रयत्न केला होता. सम्राट चौधरी बिहार विधान परिषदेत विरोधी पक्षही राहिले आहेत.
राजकीय घराण्यातून येतात : सम्राट चौधरीचे वडील शकुनी चौधरी यांचे लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्याशी जवळचे संबंध आहेत. ते खगरियाचे आमदार आणि खासदारही होते. तर सम्राट चौधरी यांच्या आई पार्वतीदेवी याही तारापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या.
हे वाचलंत का :