मुंबई Nitesh Rane On Nana Patole : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माघार घेतली असून त्यांच्याऐवजी आता काँग्रेस नेते भूषण पाटील उमेदवार असणार आहेत. भूषण पाटील यांनी आज (11 जुलै) नाना पटोले उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावरुन आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केलीय.
पटोलेंना कुणाचा फोन गेला? : यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना नितेश राणे म्हणाले, "मुंबई क्रिकेट असोसिएशनची अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. अध्यक्षपदासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यांना अर्ज मागे घ्यायला कोणी सांगितलं? शरद पवारांचं नाव वापरून त्यांना अर्ज मागे घ्यायला उद्धव ठाकरेंनी सांगितलं असेल", असा आरोप नितेश राणेंनी केला. तसंच नाना पटोले यांनी पुढं येऊन आपण अर्ज मागे का घेतला? या मागचं कारण सांगावं, असंही ते म्हणाले.
विरोधकांनी पळ काढला : पुढं मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना नितेश राणे म्हणाले, "मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यांच्याकडून एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. दुपारपर्यंत बैठकीला उपस्थित राहणार असं विरोधक सांगत होते. मात्र, शेवटच्या क्षणी महाविकास आघाडीमधील नेत्यांना कुणाचा फोन गेला? याचा देखील तपास व्हायला हवा. कारण माझ्या माहितीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना बैठकीला जाऊ नका असं फोन करून सांगितलं. त्यामुळं त्यांचा सीडीआर तपासा."
मग टीका कशाला करता? : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीचं 12 जुलै रोजी लग्न आहे. अनंत अंबानीच्या लग्नाच्या संगीत सोहळ्याला तेजस ठाकरे यांनी डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, एकीकडं अंबानी कुटुंबावर टीका करायची, गुजराती माणसावर टीका करायची आणि दुसरीकडं त्यांच्याच लग्न कार्यक्रमात डान्स करायचा, याला काय म्हणायचं? मातोश्रीत राहणारे प्राणी आहेत, ती माणसं नाहीत, अशी जहरी टीका नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
हेही वाचा -