पुणे Amit Shah on Sharad Pawar : पुण्यात रविवारी (21 जुलै) भाजपानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात अमित शाह यांनी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. "शरद पवार हे भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सरदार) आहेत," अशी खोचक टीका अमित शाह यांनी केली. तसंच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
शरद पवारांचं सरकार आलं की आरक्षण जातं : भाजपाच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह यांनी आरक्षण मुद्द्यावरुन शरद पवारांवर निशाणा साधला. "भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या. आम्ही 2014 मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं. सरकार कुणाचं आलं आणि आरक्षण गेलं? आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आलं. त्यामुळं आरक्षणासाठी भाजपाचं सरकार यायला हवं. त्यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपाचं सरकार येतं, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं, शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं," असं म्हणत त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
पुढील 30 वर्षे भाजपाचं सरकार : तसंच यावेळी बोलताना अमित शाह यांनी पुढील 30 वर्ष भाजपाची सत्ता राहिल असा विश्वास व्यक्त करत म्हटलं, "बाजीराव पेशवा आणि बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यनगरीमध्ये सांगतोय, आता तर फक्त 10 वर्षे पुर्ण झाली आहेत. पुढचे 30 वर्ष भाजपाचं सरकार या देशात राहिल. आपल्यातला आत्मविश्वासाला जागरुक करण्याची गरज आहे. आपल्यातील मतभेद दूर करण्याची गरज आहे. महान भारताची रचना ही केवळ भाजपाच करु शकते. याच आत्मविश्वासासह पुढं जायचं आहे."
काँग्रेसवर हल्लाबोल : "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील गरीब नागरिकांना घरं दिली, शौचालयं दिली, गॅस सिलिंडर दिले, वीज दिली. गरीबांना अन्नधान्य दिलं, 5 लाखापर्यंत विमा दिला. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना देत आहेत. गरीब कल्याणांचं कोणतंही काम काँग्रेस पक्ष करु शकत नाही किंवा त्यांचा कोणता मित्रपक्ष हे काम करु शकत नाही. गरिब कल्याणाचं काम हे फक्त भाजपाच करु शकते," असं म्हणत अमित शाहांनी काँग्रेसवरही हल्लाबोल केला.
हेही वाचा :