कोल्हापूर Amit Shah in Kolhapur : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेची जागा महायुतीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापुरात महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या खास बैठका घेऊन दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 'जोडण्या' लावल्या. गेली दहा वर्षे केंद्रात भाजपाची सत्ता आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात म्हणावी तशी मोट भाजपाला बांधता आली नाही. सातारा, माढा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले या जागा जिंकण्याचा महायुतीनं चंग बांधलाय. यासाठीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
शरद पवारांवर टीका : रत्नागिरीतील जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, "आतापर्यंत काँग्रेस आणि शरद पवार यांनी काल केलं. त्यांनी 370 कलम का नाही हटवलं? ते कलम 370 ला अनाथ पोरासारखं पोसत राहिले. लोकांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवलं आणि लगेच कलम 370 हटवलं आणि काश्मीर कायमचा भारताचा भाग झाला. मला उद्धव ठाकरेंना विचारायचं आहे, ज्यांच्या पाया पडून तुम्ही मुख्यमंत्री झालात, त्या काँग्रेसनं आणि शरद पवारांनी काय केलं? विरोधक म्हणाले, जर कलम ३७० हटवलं तर काश्मीरमध्ये रक्तपात होईल, ५ वर्षे झाली आहेत आणि साधी दगडफेक करण्याची हिम्मत कोणाची नाही."
नेत्यांसोबत फोनवरुन चर्चा : कोल्हापुरात केंद्रीय गृहमंत्री शाह गुरुवारी रात्री दाखल झाले. त्यानंतर आज सकाळी एका खासगी हॉटेलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची विशेष बैठक झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांसोबत थेट बैठकीमधूनच शाह यांचा जिल्ह्यातील नेत्यांशी फोनवरुन संवाद साधत कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय बैठकीत चर्चा करण्यात आली. दोन्ही जागांबाबत जिल्ह्यातील नेते, पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे यांना बैठकीतूनच शाह यांनी फोनवरुन सूचना केल्या. कोल्हापूर सांगली साखरपट्टा असल्यानं केंद्रानं साखर कारखानदारी साठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामुळं कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये साखर कारखानदारातील नेते भाजपासोबत यावेत, यासाठी केंद्रीय गृहमंत्री भाजपा नेतेअमित शाहांनी फिल्डिंग लावल्याचं चित्र पाहायला मिळालं.
करवीर निवासिनी अंबाबाईचं घेतलं दर्शन : जिल्ह्यातील नेत्यांना कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेबाबत सूचना केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि कोल्हापूरचे जावई अमित शाह यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरात येऊन देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हेही वाचा :