मुंबई- लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून मनसेकडून बाळा नांदगावकर हे लढण्याची चिन्हे आहेत. मात्र, राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे यांना दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अमित ठाकरे यांनी ही लोकसभा निवडणूक लढविली तर ते आदित्य ठाकरे यांच्यानंतर निवडणूक लढविणारे ठाकरे कुटुंबातील सदस्य असणार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सत्तेचा रिमोट हा नेहमी स्वत:जवळ ठेवला. शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीदेखील थेट निवडणूक न लढविता मुख्यमंत्री पदाची कमान सांभाळली. मात्र, राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातून निवडणूक लढविणारे पहिले सदस्य आहेत.
अमित ठाकरे जबाबदारी स्वीकारण्यास तयार- राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी यापूर्वी निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याच म्हटलं होतं. राज ठाकरेंनी मला कुठलीही जबाबदारी दिली तर मी ती यशस्वी पार पाडेल. मला नगरसेवक, सरपंच पदासाठी जबाबदारी दिली तरी ती व्यवस्थित पार पाडेल," असंही अमित यांनी पुण्यातील दौऱ्यात म्हटलं होतं. यापूर्वीचे मनसेचे १३ आमदार आणि नाशिक हा बालेकिल्ला होता. मात्र, पक्षाच्या घसरणीनंतर मनसेपुढे राजकीय आव्हानं वाढली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित ठाकरे यांनी नाशिक दौरा करत महासंपर्क अभियान राबविलं. राज्यातील महासंपर्क अभियानामध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत.
ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची रणनीती- आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत. अरविंद सावंत हेच पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याकरिता भाजपाकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
राज ठाकरे देणार राजकीय धक्का- बाळा नांदगावकर यांनी यापूर्वी दक्षिण मुंबईचं आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहे. ते राज यांचे अत्यंत विश्वासू नेते आहेत. मनसेच्या स्थापनेपासून बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या विस्तारात आणि संघटना वाढीत सक्रिय सहभाग घेतला. मात्र, राज ठाकरेंचा राजकीय धक्का देण्याचा स्वभाव पाहता ते बाळा नांदगावकर यांच्याऐवजी अमित ठाकरे यांना मैदानात उतरविण्याची शक्यता असल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
इंजिन चिन्हावर लढविण्यास मनसे इच्छुक- दक्षिण मुंबई मतदार संघावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यापूर्वीच आपला दावा सांगितला आहे. नुकतेच मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, "मी या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. आम्ही इंजिन या चिन्हावर निवडणूक लढवण्यास उत्सुक आहोत. या मतदारसंघातून मनसेला असलेला प्रतिसाद पाहता मनसेचा उमेदवार या मतदारसंघात अधिक प्रभावी ठरू शकतो आणि जिंकून येऊ शकतो."
हेही वाचा-