बारामती Supriya VS Sunetra : राष्ट्रवादी अजित पवार गटानं अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज (30 मार्च) पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची घोषणा केली.
नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येणार : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अखेर बारामतीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळं आता बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. सुप्रिया आणि सुनेत्रा पवारांनी फार पूर्वीपासूनच बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. परंतू, या दोघींनाही आज (30 मार्च) पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळं बारामती लोकसभेतील प्रचाराची रणधुमाळी आता अजूनच वाढण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाकडून चार नावं जाहीर : राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून यापुर्वी रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती. ही नावं स्वत: अजित पवार यांनी जाहीर केली होती. त्यानंतर आज सुनील तटकरे यांनी परभणी मतदारसंघातून रासपचे महादेव जानकर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
शरदचंद्र पवार गटाकडून पाच नावं जाहीर : शरदचंद्र पवार गटाकडून आज लोकसभेच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंदर्भात घोषणा असून त्यानुसार वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कराव भगरे, बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुरमधून डॉ. अमोल कोल्हे तर अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शरद पवार गटाकडून उमेदवार घोषित करण्यात आल्याच्या काहीवेळातच सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली.
सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया : बारामतीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वांचे आभार मानले. तसंच आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासासाठी केलेलं कार्य, आम्ही यापुढंही करत राहू, असंही त्या म्हणाल्या.
हेही वाचा -
- माझ्यावर झालेल्या संस्कारामुळं... ; सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवारांच्या गळाभेटीबाबत सुळे यांची प्रतिक्रिया
- बारामतीवर एकहाती वर्चस्व गाजवलेल्या पवार कुटुंबातच वर्चस्वाची 'लढाई'; लोकसभेत शरद पवारांची 'लेक आणि सुने'मध्ये थेट लढत?
- नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येणार? सुनेत्रा पवार यांच्या भाषणातील विधानामुळं चर्चेला उधाण