पुणे Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच पहिला टप्पा हा संपला असून दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झालीय. गुरुवारी महाविकास आघाडीचे बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीचे अनेक नेते उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल : बारामती लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अमोल कोल्हे, पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, अशोकबापू पवार, संजय जगताप, युगेंद्र पवार आदी मान्यवर सोबत होते. यावेळी सकाळी तिन्ही उमेदवारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून निवडणुकीचा अर्ज भरला.
सुनेत्रा पवार यांनी भरला अर्ज : सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज भरला. त्याअगोदर जाहीर सभेमध्ये भाषण करताना अजित पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली.
अजित पवारांनी केलं आवाहन : लोकसभेची निवडणूक ही गावची नाही तरी देशाची आहे. ही निवडणूक विनाकारण काही लोक भावनिक स्तरावर आणत आहेत. वेगवेगळे संबंध देत आहेत. परंतु देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही लढाई आहे. त्यामुळं घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतानं सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन अजित पवार यांनी पुण्यात जाहीर सभेत केलं.
विकासाला मतदान द्या : काहीजणांकडून नवखा उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांचा उल्लेख होत आहे. परंतु, 91 साली मी सुद्धा नवखा होतो. परंतु बारामतीकरांनी मला प्रचंड मतानं निवडून दिलं. सोसायटीची, जिल्हा परिषदची, महानगरपालिकेची, विधानसभेची, लोकसभेची निवडणूक ही वेगळी असते. त्यामुळं यावेळी विचार करून मतदान करा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
तुमच्या सगळ्या मागण्या मान्य होतील : सभेत बोलताना अजित पवार पुढं म्हणाले की, बारामती लोकसभेमधील अनेक नाराज भाजपा कार्यकर्ते यावेळी व्यासपीठावर होते. त्या प्रत्येकाच्या समोर देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीनं सांगतो की, जे काही ठरलेलं आहे, तो प्रत्येक शब्द हा या व्यासपीठावरून तुम्हाला मान्य करतो. त्यामुळं तुमच्या सगळ्या मागण्या मान्य होतील.
हेही वाचा -
- पर्यावरण रक्षणासाठी लोकसभा निवडणूक लढणारा कोल्हापूरचा अवलिया संदीप संकपाळ, सायकलवरून येत दाखल केला अर्ज - Lok Sabha Election 2024
- भाजपाची 13वी यादी जाहीर; रत्नागिरीत नारायण राणे यांना उमेदवारी, विनायक राऊतांशी रंगणार सामना - Lok Sabha Election 2024
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत भाजपाच्या 'नारायण'अस्त्रासमोर शिंदेंच्या आशेचा 'किरण' मावळला - Kiran Samant