मुंबई Pawar election symbol tussle : सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) मंगळवारी (19 मार्च 2024) शरद पवारांना मोठा दिलासा दिलाय. न्यायालयानं शरद पवार गटाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचं नाव 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' आणि पक्षाचे चिन्ह 'तुतारीवाला माणूस' (Man Blowing Turha) वापरण्याची परवानगी दिलीय.
अजित पवार गटाला नोटीस जारी : न्यायालयानं महाराष्ट्र निवडणूक आयोगाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी 'तुतारीवाला माणूस' आणि पक्षाचं नाव राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार राखीव ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ महाराष्ट्रच नव्हे तर इतर राज्यांच्या संदर्भात ते पोस्टरमध्ये शरद पवारांचे नाव वापरणार नाहीत, असं हमीपत्र देण्याचे निर्देश दिले आहेत. तर, अजित पवार गटाने मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांमध्ये नोटीस जारी करून त्यामध्ये सर्व प्रचारांच्या जाहीरातींमध्ये पक्षनाव आणि पक्ष चिन्हाबाबतचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं नमूद करावं, असेही निर्देश अजित पवार गटाला देण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं घड्याळ चिन्ह मात्र न्यायालयाच्या अंतिम निकालानंतरच वापरायचं किंवा नाही ते ठरणार आहे. त्यामुळे घड्याळ चिन्ह वापरण्याबाबत अजित पवार यांच्यावर कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार असणार आहे.
नवीन चिन्हाचे लोकार्पण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि पक्ष चिन्ह (घड्याळ) अजित पवार गटाला दिलं होतं. तसंच शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' असं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं होतं. त्यानंतर शरद पवार गटाला चिन्हही बहाल करण्यात आलं होतं. 'तुतारीवाला माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगानं त्यांना दिलं होतं. तर रायगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नवीन चिन्हाचं लोकार्पण केलं होतं.
हेही वाचा -
- Raj Thackeray Met Amit Shah : राज ठाकरे एनडीएमध्ये सहभागी होणार? अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास झाली बैठक
- 'वंचित'चा काँग्रेसला सात जागांवर पाठिंब्याचा प्रस्ताव, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षावरून विश्वास उडाला; आंबेडकरांचं खर्गेंना पत्र
- Amit Thackeray News : निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य उतरणार? अमित ठाकरे यांच्या नावाची 'या' मतदारसंघाकरिता चर्चा