मुंबई Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याबाबतचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. मात्र, हे व्हिडिओ जुने असून महाराष्ट्रातील नाहीत असा दावा मुख्य निवडणूक अधिकारी एस चौकलिंगम यांनी केलाय. तसंच महाराष्ट्रातील निवडणुका शांततेत आणि योग्यरीत्या पार पाडल्याचंही त्यांनी म्हटलंय. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले असून आता समाजमाध्यमांवर या लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र या संदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी स्पष्टीकरण दिलंय.
ते व्हिडिओ महाराष्ट्रातील नाहीत : या संदर्भात बोलताना मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले की, समाजमाध्यमांवर अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, हे व्हिडिओ महाराष्ट्रातील नाहीत. हे व्हिडिओ अन्य राज्यातील असून ते आताचे नाही तर जुने व्हिडिओ आहेत. महाराष्ट्रातील सर्व निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत शांततेत आणि योग्यरीत्या पार पडलीय. त्यामुळं अशा व्हिडिओवर कोणीही विश्वास ठेवू नये. ईव्हीएम मशीन सोबत छेडछाड केल्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र अशी कोणतीही घटना महाराष्ट्रात घडलेली नाही 2024 ची लोकसभा निवडणूक अत्यंत शांततेत पार पडली असून त्याबाबत कुठंही शंका घेण्यास वाव नाही असं ते म्हणाले.
सुरक्षेबाबत शंका घेऊ नये : दरम्यान, या संदर्भात बोलताना चोकलिंगम पुढं म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्व मतपेट्या या अत्यंत सुरक्षित आहेत. स्ट्राँग रुम सील केलेल्या आहेत. आणि स्ट्रॉंग रुम बाहेर केंद्रीय यंत्रणांचं पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ज्यांचा महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघाशी अथवा नेत्यांशी संबंध नाही असे लोक तैनात करण्यात आल्यामुळं काहीही गैरप्रकार होण्याची शक्यता नाही आणि जोपर्यंत स्ट्रॉंग रुम सील आहेत. मतपेट्या सील आहेत तोपर्यंत कुठल्याही गैरप्रकाराची असंही ते म्हणाले.
पवारांनी केली निवडणूक आयोगाकडं तक्रार : दरम्यान, महाराष्ट्रातील परळी इथं काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचं निदर्शनास आले आहेत. त्यामुळं परळी येथील मतदान पुन्हा एकदा घ्यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर मतदाना पूर्वीच्या रात्री बारामती इथं बँक कशाबद्दल सुरू होती, याचीही निवडणूक आयोगानं दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी पवारांनी केलीय.
हेही वाचा :