पुणे Assembly Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये सध्या जागावाटपावरून बैठकांचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडं विधानसभेसाठी इच्छुकांनी देखील लगबग सुरू केलीय. याच पार्श्वभूमीवर आता नुकतेच शिवसेना ठाकरे गटात सामील झालेले नेते वसंत मोरे यांनी पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केलीय. मात्र, हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडं असल्यानं आघाडीत-बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय म्हणाले वसंत मोरे? : यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधत असताना वसंत मोरे म्हणाले की, "मी दोन वेळा हडपसर मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. मात्र, आता माझ्या कात्रज परिसरातील 70 टक्के भाग हा खडकवासला मतदारसंघात गेलाय. त्यामुळं मी खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. खडकवासला मतदारसंघात आमच्या भागातील दीड लाख मतदार आहेत. या मतदारसंघात आम्ही भारतीय जनता पक्षातील उमेदवारांना टक्कर देत ही जागा जिंकून देऊ", असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला. तसंच वरिष्ठ नेतेमंडळी यासंदर्भातील निर्णय घेतील. मात्र, मी इच्छुक असल्याचं पक्षश्रेष्ठींना सांगितलंय. जर मला उमेदवारी दिली नाही तरी मी आघाडी धर्म पाळत काम करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कोणत्या पक्षाला मिळणार खडकवासला मतदारसंघाची जागा- पुणे शहरातील आठही मतदारसंघाची माहिती घेतली तर सध्या पुण्यातील कसबा, पुणे कँटोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदार संघ हे काँग्रेसकडं आहे. तर खडकवासला, पर्वती, हडपसर आणि वडगाव शेरी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडं आहे. कोथरूड मतदार संघ हा शिवसेनेकडं (उबाठा) आहे. मात्र, असं असलं तरी आता तिन्ही पक्षातील नेत्यांकडून विविध मतदार संघात दावेदारी केली जात आहे. त्यामुळं कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ मिळणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
हेही वाचा -
- विधानसभेच्या तयारीला लागा! केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा ठरला - Assembly Election 2024
- निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडून योजना आणि घोषणांचा पाऊस, केंद्र सरकारच्या योजनेचा महाराष्ट्रातच शुभारंभ का? - Vidhan Sabha Election 2024
- 'राजपुत्र' विधानसभेच्या रिंगणात? अंतिम निर्णयाची प्रतीक्षा - AMIT THACKERAY